काही दिवसांपूर्वी पुणे येथील बंद अवस्थेतील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षिय युवतीवर बलात्कार करण्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे एसटी स्थानकातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. तसेच या घटनेनंतर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेण्यात आला. यावेळी एसटी स्थानकातील सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार असून सुरक्षा रक्षकांची समिती स्थापन करून त्यात आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.
आरोपी दत्तात्रय गाडे याने वाहक असल्याची बतावणी करत एका २६ वर्षिय युवतीला बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये बलात्कार केला. या घटनेनंतर दत्तात्रय गाडे हा दोन-तीन दिवस फरार झाला होता. तसेच तो त्याच्या शिरूर येथील जुनाट गावातील ऊसाच्या शेतात लपला होता. त्यास शुक्रवारी मध्यरात्री त्याला तेथून अटक केली. दरम्यान गाडेला १२ मार्च पर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर माधुरी मिसाळ यांनी एसटी अधिकाऱ्यांची आणि पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
माधुरी मिसाळ पुढे बोलताना म्हणाल्या की, एसटी महामंडळात पूर्वीप्रमाणे सुरक्षा दक्षता अधिकारी पुन्हा नव्याने नेमण्यात येणार आहेत. तसेच सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. तसेच पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार आहे. त्याशिवाय स्वारगेट एसटी बस स्थानकात आता लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहेत. तसेच महिला सुरक्षेच्या अनुषंगाने अधिक उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार आहे. या प्रकरणाच्या तपासात जो कोणी ठेकेदार किंवा अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना माधुरी मिसाळ म्हणाल्या की, राज्यातील सर्व एसटी स्थानकावर तक्रार निवारण कक्ष, तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्रि क्रमांक सुरु करण्यात येणार आहे. तसेच खाजगी बस चालकांची एसटी स्थानकात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी उपाय योजना करण्याचे आदेश देत माधुरी मिसाळ पुढे म्हणाल्या की, परिवहन विभाग व स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने प्रवाशांच्या सुरक्षा यंत्रणांसंबधी विस्तृत आढावा घेऊन महिला सुरक्षेत सुधारणा करण्यात येतील. तसेच केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे आयुर्मान संपलेल्या सर्व एसटी बसेस १५ एप्रिलपर्यंत स्क्रॅपमध्ये काढण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya