आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की, लॉकडाऊन नाही तर कडक निर्बंध राज्यात ८५ टक्के रूग्णांना लक्षणे नाहीत

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यास भाग पाडू नका असा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिला. परंतु राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात नागरिकांना दिलासा देत लॉकडाऊन नव्हे तर राज्यात कडक निर्बंध लागू करणार असल्याची भूमिका जाहिर करत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका मांडली. मात्र बाधित ८५ टक्के रूग्णांना लक्षणे नसल्याचे टोपे यांनी सांगितले.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली मात्र त्या तुलनेत मृत्युदर कमी आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राज्यात बाधीत होणाऱ्या एकूण रुग्णांपैकी ८५ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यातील बहुतांश जणांना गृह विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे. परिणामी राज्यात सध्या रुग्णालयातील खाटांची कमतरता नाही. संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून ट्रॅकींग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार काम केले जात असून राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम आदी ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध घातले जात असून नागरिकांनीदेखील स्वयंशिस्तीने गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे या कोरोना प्रतिबंध नियमांचा वापर नागरिकांकडून झाल्यास रुग्णसंख्येला आळा घालू शकतो. त्यामुळे लॉकडाऊन टाळण्याकरिता निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
राज्यात लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर गती देण्यात आली असून दररोज किमान सव्वा लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. राज्यामध्ये लसीचा तुटवडा नसून खासगी व शासकीय रुग्णालयात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरिता प्रयत्न केले जात असल्याचे सांगतानाच ६० वर्षांवरील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची माहिती, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी नवे प्राधिकरण स्थापन करणार विधानसभेत सांस्कृतिक कार्य विभागाच्या चर्चेला उत्तर देताना दिली माहिती

राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी व्यापक पावले उचलली जात असून युनेस्को मानांकन मिळालेल्या गडकिल्ल्यांच्या व्यवस्थापनासाठी तसेच असंरक्षित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *