आमदार रईस शेख यांची माहिती, निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी भिवंडीत सह्यांची मोहीम ५६ ठिकाणी हजारो मतदारांनी सह्या करत ज्ञानेशकुमारांच्या हकालपट्टीला दिला पाठिंबा

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भिवंडीमध्ये मतदारांनी शुक्रवारी सह्यांची मोहीम चालू केली आहे. भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात येत आहे. लाखों नागरिकांच्या सह्यांचे निवेदन राज्यपाल महोदयांना भेटून देणार आहोत, असे आमदार रईस शेख यांनी सांगितले.

यासंदर्भात माहिती देताना आमदार रईस शेख म्हणाले की, जुम्माच्या नमाजानंतर आज भिवंडी पूर्व भागात तब्बल ५६ ठिकाणी सह्यांच्या मोहिमेस प्रारंभ झाला आहे. पुरुष आणि महिला मतदारांसाठी सह्यांची वेगवेगळी व्यवस्था केलेली आहे. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून राबवण्यात येत असलेल्या या मोहीमेत पहिल्या दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला. पुढील आठ दिवस ज्ञानेशकुमार यांच्या विरोधातली सह्यांची मोहीम चालू राहणार आहे.

पुढे बोलताना आमदार रईस शेख म्हणाले की, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी भिवंडीच्या लाखों मतदारांच्या सह्यांचे निवेदन महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना समाजवादी पक्षाचे शिष्टमंडळ भेटून निवेदन सुपूर्त करणार आहे. आज पहिल्याच दिवशी सर्व ५६ केंद्रावर तब्बल ३० हजारापर्यंत मतदारांनी सह्या केल्या आहेत, असे सांगितले.

शेवटी बोलताना आमदार रईस शेख म्हणाले की, मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) मध्ये झालेली अनियमितता गंभीर आहे. या मोहीमेत देशभरात १२ कोटी मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. नावात बदल करणे व नाव वगळणे या प्रक्रियेसंदर्भात ईआरओ नेट मध्ये मोठी गडबड झाली असून गेल्या १० महिन्यात दोन निवडणूक आयुक्तांनी ज्ञानेशकुमार यांच्या कार्यपद्धतीविषयी १४ वेळा आक्षेप नोंदवलेले आहेत. ज्ञानेशकुमार यांनी सत्ताधारी भाजपला लाभ पोचवण्याचे काम केले असून त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, असेही सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, शिवाजी पार्कवर तरुणाईचा प्रचंड असंतोष, सरकारविरोधातील आवाज दडपण्यासाठीच खोटे गुन्हे तरुणाईने उपस्थित केलेल्या मुळ प्रश्नांना भाजपाने उत्तर द्यावे, हिंदू-मुस्लीम व भारत-पाकिस्तानचे तुणतुणे बंद करा

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभाराविरोधात तरुणाईमध्ये प्रचंड असंतोष आहे. शिवाजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *