अखेर नाशिकची उत्सुकता संपुष्टातः शिंदे गटाचे हेमंत गोडसेच लोकसभेचे उमेदवार

मागील अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आणि शिवसेना शिंदे गटाकडून तर कधी भाजपाकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत होते. त्यातच लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र तथा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे नाव जाहिर केले होते. मात्र त्यास भाजपाने रेड सिंग्नल दिला होता. परंतु महिनाभराच्या कालावधीनंतर अखेर गोडसे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करत शिंदे गटाच्या शिवसेनेने हेमंत गोडसे यांची नाशिकमधून लोकसभा उमेदवारी जाहिर केली.

नाशिक लोकसभा मतदारसंघ भाजपाला सोडवा यासाठी सुरुवातीला आग्रह धरला होता. मात्र नंतर तो मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यासाठी सोडावा यासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेकडे आग्रह धरण्यात आल्याची चर्चा सुरु होती. त्यातच भाजपाचे नेते अमित शाह यांनी नाशिकमधून छगन भुजबळ यांनी उमेदवारी अर्ज भरावा अशी सूचना अजित पवार गटाला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केल्याची माहिती दस्तुरखुद्द छगन भुजबळ यांनी दिली होती. मात्र छगन भुजबळ यांनी नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढविण्यास फारसे उत्सुक नसल्याचे सांगत आणि त्यादृष्टीने आपली तयारी नसल्याचे सांगत या निवडणूकीत माघार घेतली.

मात्र लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसेच उमेदवार असतील असे जाहिर केले होते. त्यावरून भाजपाच्या राज्यातील बड्या नेत्यांनी बराच आकांडतांडव केला होता. तसेच परस्पर असे मतदारसंघ आणि उमेदवारांची नावे जाहिर करायची नाहीत असा सज्जड दमही शिंदे गटाला दिल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून भाजपाच्या सहमतीशिवाय कोणत्याच मतदारसंघ आणि तेथील उमेदवार जाहिर करण्याच्या फंदात पडले नसल्याची चर्चा राजकिय वर्तुळात आजही चर्चिली जात आहे.

दरम्यानच्या काळात हेमंत गोडसे हे जवळपास दोन ते तीन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आपल्या समर्थकांसह मुंबईत येऊन भेटून गेले. त्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्याबाबत कोणतीही घोषणा करण्याचे टाळले. तर दुसऱ्याबाजूला अजित पवार यांच्या गटाकडून नाशिकच्या जागेबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढविणार की शिंदे यांची शिवसेना निवडणूक लढविणार अशी संभ्रमावस्था नाशिकच्या मतदारांसह राज्याच्या राजकिय वर्तुळात निर्माण झाली.

अखेर आता तिसऱ्या, चवथ्या आणि पाचव्या टप्प्यातील निवडणूकीची तारीख जवळ यायला लागली. त्यामुळे अखेर शिंदे गटाच्या शिवसेनेने हेमंत गोडसे यांचे नाव आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत जाहिर केले. दरम्यान हेमंत गोडसे यांनीही लोकसभा प्रचाराच्या कामाला यापूर्वीच सुरुवात केली. आता त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली असल्याने अखेर हेमंत गोडसे यांना दिलासा मिळाला आहे.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *