अहमदनगर – राहुरीः प्रतिनिधी
मुख्यमंत्री सांगतात महाराष्ट्रात निवडणूकच नाही… इथे विरोध करायला माणसंच नाहीत… निवडणूकीची मजा येत नाही… चांगली गोष्ट आहे निवडणूकीची मजा येत नाही तुम्हाला… मग देशाचे पंतप्रधान नऊ वेळा महाराष्ट्रात का येतात… विरोधकच नाही मग गृहमंत्री कानाकोपऱ्यात फिरुन २० सभा का घेतात… मुख्यमंत्री प्रत्येक तालुक्यात का हिंडतात असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विचारत त्यांना आता कळंलय की, या जनतेच्या मनात भाजप बद्दल, सरकारबद्दल नाराजी आहे त्यामुळेच पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्यमंत्री, इतर राज्याचे मुख्यमंत्री सभा घेत आहेत असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रातील जनता यांना पाठिंबा देईल याची खात्री त्यांना नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक धोरणं जाहीर केली परंतु प्रत्यक्षात काय केलं असा सवालही त्यांनी यावेळी केला.
त्याचबरोबर राज्याचं पुन्हा वाटोळं करण्यासाठी तुम्हाला सत्ता द्यायची का असा सवाल सरकारला करतानाच असले सरकार पुन्हा सत्तेत येता कामा नये यासाठी जागृत राहून काम करा असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ शरद पवार यांची जाहीर सभा आज राहुरी येथे पार पडली.
महाराष्ट्राला नेतृत्व देणारा अशी गणना करणारा हा जिल्हा…या नगर जिल्ह्यात भाजपाच्यावतीने जो उमेदवार देण्यात आला. त्यामुळे नगर जिल्हयाची प्रतिष्ठा उध्वस्त होत असल्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आम्ही एकदा चुक केली होती आणि या उमेदवाराला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. नंतरच्या काळात त्यांची एकंदरीत स्थिती, त्यांचे उद्योग… अधिकाराचा गैरवापर… या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी पावले टाकली. हे समजल्यानंतर अशा व्यक्तीपासून दुर राहिलं पाहिजे. नुसतंच असं नव्हे तर ही प्रवृत्ती राजकारणात दिसता कामा नये या प्रकारचा आग्रह राहुरी तालुक्याच्या जनतेसमोर जावून केला पाहिजे यासाठीच मी इथे मुद्दाम आल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना मदत करण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो. राहुरी हा राज्यातील महत्वाचा तालुका… कृषी विद्यापीठाचं केंद्र असलेला तालुका आहे. उत्तम सहकारी साखर कारखाना चालणारा तालुका म्हणून याचा लौकिक आहे. मला आठवतंय अनेक राज्यसरकारची महाराष्ट्रातील धोरणं इथं ठरली. त्याची सुरूवात राहुरी तालुक्यातून झाली आहे. बाबुराव तनपुरे यांच्याकडे नेतृत्व असताना संबंध महाराष्ट्रातील कॉग्रेसचे नेते मग ते यशवंतराव चव्हाण असतील, वसंतराव नाईक असतील, वसंतदादा पाटील ही सगळी मंडळी राहुरी मध्ये जमली होती. राहुरीत दोन दिवस राहिले. बाबुरावांनी त्यांची पुर्ण व्यवस्था केली होती. महाराष्ट्राचा कारभार कसा करायचा यासंबंधीचे निर्णय झाले त्यानंतर महाराष्ट्राला पुढे नेण्याची कामगिरी केली असा राहुरीचा लौकिक आहे. त्या राहुरीचे आज काय चित्र केलं…कार्यकर्त्यांना माणसातून उठवू, खोटे आरोप करणं, मोका लावण्याची कारवाई, यासाठी आमदारकीची सीट निवडून देता का ? यासाठी सत्ता तुमच्या हातात दिली का? याचं भान ज्यांना रहात नाही अशी मंडळी मत मागण्यासाठी तुमच्यापर्यंत येतात. त्यांना धडा शिकवण्याचे काम तुम्ही करा असे आवाहनही त्यांनी केले.
भाजपाच्या माध्यमातून ज्या समाजविरोधी प्रवृत्ती वाढत आहेत त्या प्रवृत्तीचा पराभव करण्याचे काम करायचं आहे. त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
Marathi e-Batmya