ओबीसी बेरोजगारांना आता १० ते ५० लाखाचे कर्ज मिळणार

विविध महामंडळांसाठी ७३६ कोटींच्या अनुदानास मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई : प्रतिनिधी

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागांर्तगत येणाऱ्या महामंडळांना विविध योजना राबविण्यासाठी ७३६.५० कोटी रुपयांचे सहाय्यक अनुदान देण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिल्याची माहिती या विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मंत्रालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस विभागाचे सचिव जे. पी. गुप्ता उपस्थित होते.

 अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या व तशी क्षमता असणाऱ्या तरुणांना आर्थिक सहाय्य पुरविण्यासाठी योजना राबविण्यात येत आहेत. त्याच धरतीवर आता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (मर्या.) मार्फत विविध योजना राबविण्यासाठी या महामंडळास रु. २५० कोटी रुपयांचे सहाय्यक अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळासाठी ३०० कोटी रुपयांचे सहाय्यक अनुदान पुढील तीन वर्षामध्ये उपलब्ध करुन देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या सहाय्यक अनुदानातून विविध योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यात मागासवर्गीय तरुण उद्योजकांसाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमार्फत रु. १० लाखापर्यंत कर्ज आणि गट कर्ज परतावा योजनेंतर्गत १० ते ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे. या दोन्ही  योजनेसाठी प्रत्येकी ५० कोटी असे १०० कोटी रुपये अनुदान पुढील तीन वर्षामध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य इतर मागसवर्ग वित्त व विकास महामंडळ (मर्या.) च्या भागभांडवलामधून देण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेची मर्यादा रू. २५ हजारावरून १ लाखापर्यंत करण्यात आली आहे. नियमित हप्ता भरणाऱ्यास ही बिनव्याजी कर्ज योजना असणार आहे. थकित हप्त्यासाठी ४ टक्के दराने व्याज आकारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

याचबरोबर इतर मागास वर्ग व इतर समाजातील बारा बलूतेदारांच्या परंपरागत व्यवसायाची उत्पादकता वाढविण्यासाठी त्यांना आधुनिक साहित्य व वस्तू वाटपासाठी रु. १०० कोटी अनुदानातून विशेष योजना राबविण्यात येणार आहे. वडार, पारधी व रामोशी या अतिमागास समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (मर्या.) ची उपकंपनी असणाऱ्या शामराव पेजे आर्थिक विकास उपकंपनीमार्फत विविध योजना राबविण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील मुलामुलींची शैक्षणिक गरज लक्षात घेता मागणीनुसार प्रत्येक जिल्ह्यात १ वसतीगृह सुरु करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली. केंद्र सरकारच्या या योजनेसाठी राज्याचा आवश्यक असणारा हिस्सा रु. ५१ कोटी देण्याबाबत मान्यता देण्यात आल्याचेही ते म्हणाले.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थीनींना लागू

ओबीसी प्रवर्गातील इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थीनींना ६० रूपये प्रति महिना तर इयत्ता ८ वी ते  १० वीच्या विद्यार्थीनींना १०० रूपये प्रति महिना शिष्यवृत्ती देण्यात येईल. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून एकुण १० महिन्यांसाठी ही शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी हि योजना केवळ विजाभज व विमाप्र प्रवर्गातील मुलींसाठी लागू होती. आता ती इमाव प्रवर्गातील मुलींसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी वार्षिक १८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

इतर मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार

तसेच इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) मुलामुलींसाठी गुणवंत पुरस्कार देण्यात येत नव्हता. राज्यातील व विभागातील १० वी  व १२ वीमध्ये प्रथम येणाऱ्या मुलांमुलींना हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी ५० लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे.

About Editor

Check Also

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *