पॅरा ऑलंपिकमध्ये कर्तृत्व गाजवणाऱ्या दिव्यांगांसाठी क्रिडा प्रबोधिनी स्थापणार सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी
पॅरा ऑलंपिकमध्ये कर्तृत्व गाजवणाऱ्या आणि इच्छूक दिव्यांगांसाठी मुंबई अथवा पुणे येथे क्रिडा प्रबोधिनी स्थापन करण्यात येईल, यासाठी जागेचे उपलब्धता जेथे होईल तेथे प्राधान्याने प्रबोधिनी सुरू करण्यात येईल. उच्च व तंत्र शिक्षण, कौशल्या विकास विभाग, वैद्यकिय शिक्षण आणि अपंग विभागाची संयुक्त समिती स्थापन करून दिव्यांगांना उच्च शिक्षणात तज्ज्ञ अध्यापक, शिक्षकांची कुठे आणि किती आवश्यकता आहे, यासंबंधीचा डाटा तयार करण्यात येईल, यासाठी एका आठवड्यात बैठक घेण्यात येणार आहे. तसेच शिक्षण व प्रशिक्षण केंद्रही स्थापन करण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केली.
मंत्रालयात सर्व प्रकारच्या दिव्यांगांच्या विकास व पुनर्वसनासंबधिची आढावा बैठक पार पडली. त्यानंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते.
राज्यातील दिव्यांगासाठी केंद्रीय दिव्यांग कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, यासाठी राज्यातील संबंधित सर्व विभागांनी आपापल्या पातळीवर परिपत्रक निर्गमित करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
ज्येष्ठ नागरिकांच्या धर्तीवर सर्व प्रकारच्या दिव्यांगांना शिवनेरी, शिवशाही सह सर्वच शासकिय बसमध्ये मोफत प्रवासाची सवलत देण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभागासोबत पाठपुरावा करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पूर्वीच्या काळात दिव्यांगांचे केवळ 4 प्रवर्ग होते. मात्र केंद्र शासनाने यात वाढ केल्यामुळे आता 21 प्रकारचे दिव्यांग आहेत. या वाढीव प्रमाणात रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये दिव्यांगांसाठी आरक्षित बोगींची संख्या वाढवावी, उपनगरी रेल्वेच्या लोकल मधील प्रवासात सवलतही देण्याबाबत तसेच रेल्वे फलाटावर बुट पॉलिश करणाऱ्यांप्रमाणे वस्तू विक्री करणाऱ्या दिव्यांगांना रेल्वेने ओळखपत्र द्यावे, यासाठी रेल्वे मंत्रालयासोबत पाठपुरावा करण्यात येणार आहे, असेही बडोले यांनी यावेळी सांगितले.
मुंबई महापालिकेच्या रूग्णालयामध्ये दिव्यांगाना वैद्यकिय प्रमाणपत्र देण्यासाठी ठराविक दिवस राखून ठेवण्यात यावा, यादिवशी तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित राहून प्रमाणपत्रांचे वाटप करावे, तसेच गोंदिया आणि नागपूरच्या धर्तीवर युडीआयडीचे कँप लावून दिव्यांगाना घरपोच वैद्यकिय प्रमाणपत्र वितरीत करावे, असेही निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या बैठकीत अपंग उपायुक्त, नगरविकास विभाग, कौशल्य विकास विभाग, परिवहन विभाग, माहिती तंत्रज्ञान, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महावितरण, मुंबई मनपा रूग्णालये उपसंचालक, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

About Editor

Check Also

छगन भुजबळ यांची मागणी, राज्यात पीएनजी नेटवर्क वाढीसाठी केंद्र शासनाकडून आर्थिक पाठबळ आवश्यक निवासी व व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी व पीएनजी गॅसचा अधिक चांगला व सुलभ पुरवठा उपलब्ध करून देणे

पीएनजी नेटवर्कचा राज्यभर विस्तार अधिक वेगाने करण्यासाठी केंद्र शासनाकडून तांत्रिक सहाय्य तसेच पायाभूत सुविधा उभारणीसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *