भाजपा-शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले “हे” निर्देश राज्यात सुरू असलेली विकासकामे 'मिशन मोडवर' पूर्ण करावित

राज्यात एकाबाजूला राजकिय भूकंप आणि उलथापालथींना मोठ्या प्रमाणावर वेग आलेला आहे. त्यामुळे राज्याच्या नेतृत्वात बदल होतोय की काय अशी चर्चा सातत्याने होत आहे. त्यातच शेजारील कर्नाटक राज्यातही विधानसभा निवडणूकांमुळे राजकिय वातावरण चांगलच तापलेले आहे. त्यामुळे राज्यातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आणि विधानसभा निवडणूका कधीही लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच भाजपा-शिवसेना (शिंदे गट)च्या आमदार खासदारांनी केलेल्या विकास कामे रखडली जाऊ नयेत यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची आणि लोकप्रतिनिधींची कामे मिशन मोडवर पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

या बैठकीला शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर, भाजपा खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अमित साटम, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड या लोकप्रतिनीधींच्या मतदारसंघांमधील विविध विकास कामांविषयी आढावा घेणारी बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यावेळी उपस्थित होते.

लोकप्रतिनिधींच्या मतदार संघांमध्ये सुरू असलेले रस्ते, उद्याने, जलसिंचन प्रकल्प, वळण रस्ते, उड्डाणपूल ही विकासकामे कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी मिशन मोडवर काम करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ह्या सर्व विकासकामांचा प्रत्यक्ष फायदा सामान्यांना मिळाला पाहिजे. त्यासाठी आवश्यक त्या प्रक्रियांना गती देऊन कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खेळांची आणि मनोरंजनाची मैदाने देखभाल तत्वावर हस्तांतरित करण्यास शासनाने दिलेली स्थगिती उठवावी, अशी मागणी यावेळी खासदार किर्तीकर, शेट्टी यांनी केली. याबाबत सविस्तर चर्चा बैठकीत करण्यात आली. यासंदर्भात एक धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना दिले. वर्सोवा अंधेरी येथील खाडीतील गाळ काढणे, त्या ठिकाणी नवीन मच्छ‍िमार जेट्टी बांधणे याविषयी चर्चा झाली.

आमदार संजय गायकवाड यांच्या बुलढाणा मतदारसंघातील विविध विषयांबाबत यावेळी चर्चा झाली. बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेमुळे सुमारे ४३ हजार हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार असून त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे या योजनेला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना दिले.

बुलढाणा शहरालगत कृषी महाविद्यालय स्थापन करणे, मोताळा तालुक्यात नवीन एमआयडीसी स्थापन करणे, बुलढाणा शहराला रिंग रोड मंजूर करून बुलढाणा-खामगाव रस्त्यावरील बोथा अभयारण्यात उड्डाणपूल बांधणे, राजूर घाटात एकेरी वाहतूक करणे, आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

About Editor

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, परिवहन विभागात बदली आणि वसुलीचे मोठे रॅकेट मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

परिवहन विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या आणि छळवणुकीच्या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश करत आरटीओ विभागातील बदल्या आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *