पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात केंद्र सरकारने एस्मा ESMA लागू केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारच्या ऊर्जा धोरणावर जोरदार टीका केली आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत सर्व काही सुरळीत असल्याचा दावा करणाऱ्या सरकारने अचानक एस्मा ESMA लागू केल्याने परिस्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट होत असल्याचे म्हटले.
प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, केंद्र सरकार अनेक वर्षांपासून ‘आत्मनिर्भरते’चे जुमले देत आहे. मात्र आवश्यक गॅस साठा आणि त्यासंबंधित पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात संभाव्य संघर्ष होऊ शकतो आणि त्याचा पुरवठा साखळीवर परिणाम होऊ शकतो, हे माहित असूनही सरकारने कोणतीही ठोस तयारी केली नाही, असा आरोप केला.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, तसेच अल्जेरिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, नॉर्वे यांसारख्या देशांकडून गॅस आयात करण्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. अमेरिका–इराण संघर्ष प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत सरकारने या पर्यायांना दुय्यम प्राधान्य दिले, असेही नमूद केले.
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, या पार्श्वभूमीवर भारताच्या ऊर्जा धोरणाची पोलखोल झाली असून इतक्या मोठ्या संकटासाठी केंद्र सरकार तयार नव्हते, अशी टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हर्षदीप सिंह पुरी यांच्या धोरणांमुळे लहान व मध्यम स्तरावरील ढाबे, रेस्टॉरंट्स तसेच हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील लोकांच्या उपजीविकेवर गदा येणार असल्याचेही भीती व्यक्त केली.
प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, याशिवाय विवाह सोहळे आणि धार्मिक कार्यक्रमांतील केटरिंग व्यवसायावरही याचा परिणाम होईल. गॅसची कमतरता आणि दरवाढ यामुळे एलपीजी LPG वर चालणाऱ्या लाखो ऑटो व टॅक्सी चालकांवर थेट परिणाम होणार असून खत उद्योगावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. परिणामी शेती उत्पादन कमी होऊन अन्नधान्य महागण्याची शक्यता असल्याची शक्यताही यावेळी वर्तविली.
शेवटी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सीएनजी CNG ला सध्या प्राधान्य दिले जात असले तरी अमेरिका–इराण संघर्ष दीर्घकाळ चालल्यास सीएनजी CNG वर अवलंबून असलेल्या भारतीय उद्योगांवर आणि विविध क्षेत्रांवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशाराही देत पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेसमोर नतमस्तक होऊन भारतातील मध्यमवर्गीय आणि गरीब जनतेला संकटात ढकलले असल्याची टीकाही केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेसमोर नागडे झाले आहेत आता ते देशातील जनतेला नागडे करतायत का? असा खोचक सवालही यावेळी केला.
Marathi e-Batmya