वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलणार नाही ठाकरे गटाशी आमची बोलणी सुरु आहे त्याबाबत उध्दव ठाकरे घोषणा करतील

स्व.प्रबोधनकारक ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमाच्या निमित्ताने वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे पहिल्यांदाच एकाच मंचावर आले. त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांना साद घालत युतीसाठी आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत प्रकाश आंबेडकर यांनीही ठाकरे गटाशी युती करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर वंचित आणि ठाकरे गटात चर्चा होऊन त्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलणार नसल्याची भूमिका जाहिर करत वंचित-शिवसेनेच्या युतीबाबतची अधिकृत घोषणा शिवसेनेकडून उध्दव ठाकरे करतील असे जाहिर केले.

ठाकरे गट महाविकास आघाडीचा भाग असून उध्दव ठाकरे यांनी वंचितबरोबर युती केल्यास वंचित महाविकास आघाडीत येणार की फक्त ठाकरे गटाबरोबर येणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीबाबत प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका यापूर्वीच स्पष्ट करत त्या विषयीचा पुर्नरूच्चार त्यांनी आजही करत युतीबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा करणार नसल्याचे स्पष्ट करत आम्ही महाविकास आघाडीचा भाग बनणार की फक्त शिवसेनेसोबत आमची युती राहणार याबद्दल उध्दव ठाकरे हेच जाहिर करतील असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर संध्याकाळी उशीरा वंचित बहुजन आघाडीकडून एक पत्रक जारी करण्यात आले असून उद्या दुपारी १ वाजता उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे.

तर दुसऱ्याबाजूला प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितसोबत चर्चा करण्यासाठी ठाकरे गटाकडून सुभाष देसाई यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याबाबत सुभाष देसाई यांना विचारले असता ते म्हणाले, वंचित बहुजन आघाडीबरोबर आमची सर्व चर्चा झालेली आहे. सगळ काही ठरलेलं आहे. याबाबतची सर्व माहिती लवकरचं जाहिर करण्यात येणार असल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिर पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील तीन दिवसीय निवासी शिबिर २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी चिपळूणमध्ये

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *