पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती, देशाला नव्या धर्मनिरपेक्ष नागरीसंहितेची गरज… महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करा

देशात आतापर्यंत नागरीसंहिता अस्तिवात आहे ती धार्मिक स्वरूपातील आहे. मागील ७५ वर्षापासून या धार्मिक नागरी संहितेचे ओझे आपण वहात आलो आहोत. आता देशाला नव्या धर्मनिरपेक्ष नागरी संहितेची (सेक्युलर सिव्हील कोड) गरज आहे. त्यादृष्टीनेच देशात सीसीए कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता देशात नव्या धर्मनिरपेक्ष नागरी संहिता लागू करण्याची गरज असल्याचे भूमिका यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना स्पष्ट केली.

देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिना निमित्त नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर प्रथेप्रमाणे पंतप्रधानांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महिलांवरील अत्याचारांवरून जनतेमध्ये तीव्र नाराजी असताना देशातील सर्व राज्य सरकारांनी महिलांची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे. तसेच देशातील जनतेचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी अशा गुन्ह्यांप्रकरणाचा तपास जलद होण्याची गरज असून अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा होण्याच्या गरजेवरही भर दिला.

कोलकाता येथील रूग्णालयात ३१ वर्षीय महिला डॉक्टरच्या निर्घृण बलात्कार आणि हत्येप्रकरणी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात येत आहेत. हा निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव न घेता सुनावले.
पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, मी आज पुन्हा एकदा लाल किल्ल्यावरून माझी व्यथा मांडू इच्छितो. एक समाज म्हणून आपल्याला महिलांवर होत असलेल्या अत्याचाराचा गांभीर्याने विचार करावा लागेल – याविरोधात देशात संताप आहे. हा आक्रोश देश, समाज आणि राज्य सरकारांनी गांभीर्याने घ्यावा, महिलांवरील गुन्ह्यांचा जलद तपास करावा, या राक्षसी कृत्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी – समाजात आत्मविश्वास जागृत करण्यासाठी हे महत्त्वाचे असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, एखाद्या अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण प्रसारमाध्यमांमध्ये त्या गोष्टीची चर्चा होते. परंतु त्यावर दररोज नवी माहिती बाहेर येत राहते. मात्र महिला अत्याचारातील गुन्हेगारास जेव्हा शिक्षा होते. तेव्हा त्या शिक्षेची बातमी प्रसारमाध्यमात कोठे तरी कोपऱ्यात त्याची माहिती दिली जाते. पण राज्य सरकारांनी अशा पध्दतीची कोणतीही अशा गुन्हेगाराचे आणि तशी मानसिकता असलेल्याचे धाडस होऊ नये अशी कडक शिक्षा दिली जावी अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या शेजारील देश बांग्ला देशामध्ये सध्या सुरु असलेल्या घडामोडींचा उल्लेख करत म्हणाले की, बांग्लादेशाच्या विकासात भारताचेही योगदान आहे. आणि यापुढेही राहणार असल्याचेही यावेळी सांगितले.

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, देशात वन नेशन वन इलेक्शन असणे गरजेचे असून भारताच्या विकासात अडथळे आणणाऱ्यांनी याबाबत विचार करावा असे काँग्रेसचे नाव न घेता टीका करत सोबत येण्याचे आवाहन केले. या मुद्यांवरून देशभरात चर्चा झाली असून या चर्चेतून हा मुद्दा पुढे आला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनीही याचा विचार करण्याची गरज असल्याचे मतही यावेळी स्पष्ट केले.

शेवटी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, १४० कोटींची लोकसंख्या असलेला देश देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढला. तोच देश आता समृद्ध भारतासाठी प्रयत्न करेल आणि समृध्द भारताच्या निर्मितीत आपले योगदान देईल असे सांगत आपल्या दिड तासाच्या भाषणाचा समारोप केला.

About Editor

Check Also

नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *