नाना पटोलेंचा खोचक टोला, पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा आले म्हणजे निवडणूका जवळ आल्या अदानी’ संदर्भात राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नावर मोदी कधी बोलणार ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिनाभरातच मुंबईचा दुसरा दौरा केला याचा अर्थ निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणुकीशिवाय मोदींना मुंबई, महाराष्ट्राची आठवण होत नाही. जानेवारीत मेट्रोचे उद्घाटन व आता वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणे हे केवळ निमित्त आहे. मोदींच्या दौऱ्याने कसलाही फरक पडत नाही मात्र मुंबईच्या दुसऱ्या दौऱ्यात तरी पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील प्रश्नांवर बोलणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी पुन्हा मुंबई व महाराष्ट्राची घोर निराशच केली, असा घणाघाती हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येतात याचा आनंदच आहे पण त्यांना महाराष्ट्रातील प्रश्नाची जाणीव नाही. जानेवारीत ते आले पण मुंबई व महाराष्ट्रातील प्रश्नावर काहीही बोलले नाहीत. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही गंभीर समस्या आहे त्यावर ते बोलत नाहीत. आजही या विषयावर ते गप्पच होते. २०१४ पूर्वी मात्र नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘चाय पे चर्चा’ करत होते. आता ते केवळ ‘मन की बात’ करतात, जनतेची ‘मन की बात’ करायला पाहिजे. मागच्या महिन्यात मोदींच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी भाजपाची दमछाक झाली. फेरिवाल्यांना आमिष दाखवून सभेला बसवावे लागले. भाजपाने कितीही प्रयत्न केला तरी जनतेने त्यांचा निर्णय पक्का केला आहे. भाजपाने महाराष्ट्रासह देशाच्या जनतेला फसवले आहे म्हणूनच भाजपाला मतदान करायचे नाही अशी मानसिकताच जनतेने बनलेली आहे.

खा. राहुल गांधी यांनी लोकसभेत अदानीसंदर्भात काही प्रश्न विचारले होते पण त्यावर पंतप्रधान मोदी संसदेत एक शब्दही बोलले नाहीत. मुंबईच्या भाषणा तरी ते त्यावर काही बोलतील असे वाटले होते पण अदानीवरही ते बोलले नाही. मोदी म्हणतात त्यांच्यासोबत देशातील १४० कोटी लोक आहेत मग एलआयसी व एसबीआयमध्ये या १४० कोटी जनतेमधीलच लोकांचे पैसे आहेत, तो पैसा सुरक्षित आहे का यावर त्यांनी बोलायला पाहिजे होते पण मोदींनी कोणत्याच प्रश्नाचे उत्तर दिले नाही यातून ते अदानीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत हे स्पष्ट झाले.

काँग्रेसमध्ये वाद नाही; काँग्रेसला बदनाम करण्याचा भाजपाचा प्रयत्न

पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्षात कोणताही वाद नाही. भारतीय जनता पक्षाचा सतत पराभव होत असल्याने ते काँग्रेसची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला आहे की नाही हे मला माहीत नाही त्यामुळे त्यावर मी उत्तर कसे देऊ असे ते म्हणाले. रायपूरमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान अधिवेशन होत आहे. या अधिवेशनानंतर काँग्रेसमध्ये बदल होतील. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनामध्ये माझ्यासंदर्भात अग्रलेख लिहून माझ्या शक्तीची जाणीव करुन दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

About Editor

Check Also

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व एसटी बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *