पृथ्वीराज चव्हाण यांचे आवाहन, पंतप्रधान मोदी प्रचंड दबावात, सरकारचे अपयश व जनतेचे मुद्दे घेऊन रस्त्यावर उतरा भावना दुखावल्या गेल्याबद्दल शिवप्रेमींची दिलगीरी व्यक्त करतो: हर्षवर्धन सपकाळ

भाजपाने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला, सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली, असा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा आणि त्यांच्या पिलावळीकडून हा अपप्रचार नियोजनपूर्वक पसरवण्यात आला व त्याआधारे राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला. भाजपाच्या गलिच्छ खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो. कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता. आता हे प्रकरण येथेच थांबवू, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची संयुक्त बैठक टिळक भवन येथे संपन्न झाली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, खजिनदार अभय छाजेड, वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, मोहन जोशी, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, अनंत गाडगीळ, गोपाळ तिवारी आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे, ते माझे आदर्श, प्रेरणास्थान आणि स्वाभिमान आहेत, त्यांच्या तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही, मी तुलना केलेली नाही. इतिहासावर मतभेद असू शकतात मात्र त्यावर संयत, अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी आणि समाजात संघर्ष निर्माण होऊ नये, जात-धर्म-पंथावर ध्रुवीकरण अजिबात खपवून घेता कामा नये, हीच भूमिका मी मांडली होती. शिवजयंती दोन दिवसांवर आली आहे,  आपण सर्वांनी गैरसमज दूर ठेवूया, अपप्रचाराला बळी पडू नका. भाजपाने याप्रश्नी अत्यंत हिन पातळीवरचे राजकारण केले, मला धमक्या दिल्या पण अशा धमक्यांना मी घाबरत नाही. भाजपाची पोलखोल करतच राहणार, अंगावर आले तर शिंगावर घेऊ, असा इशाराही दिला.

आजच्या बैठकीबद्दल बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे घेऊन मला एका वर्ष झाले, या एका वर्षात मी केलेल्या कामाचा अहवाल आजच्या बैठकीत मांडला, तसेच आगामी वर्ष संघटन बांधणीचे वर्ष म्हणून काम केले जाणार आहे. ग्रामीण भागात मंडल स्तरावर, गावपातळीवर व शहरात वार्ड प्रभाग अध्यक्ष नियुक्त करण्याचे नियोजन आहे.  भाजपा सरकारचे अपयश जनतेसमोर मांडण्यासाठी शेतकरी, बेरोजगारी, महिला सुरक्षा, कायदा सुव्यवस्था सारख्या मुलभूत प्रश्नांवर विविध पद्धतीने आंदोलन करुन सरकारला जाब विचारला जाईल, असेही सांगितले.

बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भाजपा सरकार सर्व पातळ्यावर अपयशी ठरले आहे. अमेरिकेबरोबरचा व्यापार करार, एपस्टिन फाईल्समुळे  पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड दबावात आहेत. सरकार विरोधातील प्रश्नावर जनमानसात माहिती पोहचवली पाहिजे. शेतकरी प्रश्न, बेरोजगारी व इतर मलभूत प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले पाहिजे. सरकारविरोधात लढले पाहिजे. कोस्टल रोडवरून दररोज अंदाजे ५० हजार लोक प्रवास करतात तर लोकलमधून दररोज ९० लाख लोक प्रवास करतात. लोकलमधून दररोज १० प्रवाशांचे मृत्यू होतात, लोकल प्रवाशांना सुविधा दिल्या पाहिजेत. दररोज ८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. काँग्रेस पक्ष सर्वात मोठा विरोधी पक्ष असून एका सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावली पाहिजे, असे सांगितले.

ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी ‘काँग्रेसने विचारधारेचे राजकारण का केले पाहिजे?’ या विषयावर व्याख्यान दिले तर ज्येष्ठ पत्रकार अमेय तिरोडकर यांनी  ‘महाराष्ट्राची बदलती राजकीय संस्कृती’ या विषयावर व्याख्यान दिले.

हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल यावेळी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

About Editor

Check Also

एकनाथ शिंदे यांचे भावूक उद्घगार, अजितदादांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक

लाखांचा पोशिंदा जावा आणि लाखो लोक अनाथ व्हावेत, अशीच काहीशी अवस्था अजितदादांच्या जाण्याने झाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *