लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा प्रचार आहे. येत्या १३ मे रोजी महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच महाराष्ट्रातील बीड आणि नंदूरबार लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ नुकताच पार पडला. या दौऱ्यात नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन होण्याऐवजी भाजपासोबत या असे आवाहन केले. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीकेची झोड उठविली. दरम्यान आज काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहिर सभा घेतली.
या सभेत बोलताना प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडत, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका विशिष्ट समुदायाचा उल्लेख करून त्यांना सातत्याने धमकी देण्याचा प्रयत्न करतात. ज्या पंतप्रधान पदावर आज ते विराजमान आहेत त्या पदाची शान यापूर्वीच्या अनेक पंतप्रधानांनी राखली आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पंतप्रधान पदाच्या सर्वोच्च स्थानी विराजमान असतानाही महिलांचा सन्मान राखण्यात अपयशी ठरले असल्याची टीकाही यावेळी केली.
पुढे बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग, इंदिरा गांधी, पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासारख्या अनेक चांगल्या व्यक्ती या पदावर विराजमान झाल्या. इंदिरा गांधी यांनी तर पाकिस्तानचे दोन तुकडे केले. धाडस काय असते ते इंदिरा गांधी यांच्याकडून शिकून घ्या असा उपरोधिक टोलाही यावेळी नरेंद्र मोदी यांना लागवाल.
प्रियंका गांधी पुढे बोलताना म्हणाल्या की, आज १० वर्षे सत्तेत असलेले नरेंद्र मोदी हे मणिपूर येथील महिलांवर अत्याचार होत आहेत म्हणून ते बघायलाही जाण्यासाठीही हिंमत दाखवित नाहीत. हाथरसमधील एका दलित मुलीवर अत्याचार झाला तर तिच्या घरच्यांना न बोलविताच तिच्यावर अंत्यसंस्कार घाईघाईत उरकून घेण्यासाठी दबाव आणला. असा आरोप करत कुस्तीतील खेळाडू असलेल्या महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप गोल्ड मेडल मिळविणाऱ्या महिला कुस्तीगिरांनी भाजपाच्या खासदाराच्या विरोधात दिल्लीच्या रस्त्यावर आंदोलन केली. परंतु त्यांचे आंदोलन मोडून काढले गेले. परंतु त्याच महिला कुस्तीपटूंनी पदक जिंकले तेव्हा त्यांना घरी बोलावून त्यांचा सन्मान केला, त्यांच्यासोबत फोटो काढले. पण त्यांच्यावर अत्याचार झाल्यानंतर मात्र त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही अशी टीका यावेळी केली.
पुढे बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, काल या भागात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आले होते असे ऐकले. त्यांचे भाषण तुम्ही ऐकले की नाही मला माहित नाही. परंतु काल ते सांगत होते म्हणे की, ते शबरीचे पुजारी आहेत म्हणून ( असे वाक्य उच्चारताच उपस्थित समुदायातून हास्याची एक हलकीशी लकेर उमटली). पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेथे जातात तेथील कोणाचे तरी नाव घेऊन स्वतःचा संबध जोडण्याचा प्रयत्न करत असतात. त्या काळी राम यांच्या प्रतिक्षेत शबरीने अनेक दिवस वाट पाहिली. तसेच शबरीचा सन्मानही रामाने केला. परंतु आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्त्री शक्तीचे नाव घेतात, मात्र स्त्रीयांवरील अन्यायावर मात्र धाडस दाखविण्याऐवजी गप्प बसतात, असा उपरोधिक टीकाही यावेळी लगावला.
प्रियंका गांधी पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने जे देशासाठी शहीद झालेल्या व्यक्तींवर आणि माजी पंतप्रधानांवर सातत्याने टीका करतात. परंतु त्यांच्या विरोधात बोललेली एकही गोष्ट खपवून घेत नाहीत. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करतात असा गंभीर आरोपही केला.
Marathi e-Batmya