विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या काही दिवस आधी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. तर परभणीतील राज्यघटनेच्या विटंबनेच्या प्रकरणी झालेल्या आंदोलनात पोलिसांनी अटक केलेल्या दलित कार्यकर्ता सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिस तुरुंगात असताना मृत्यू झाला. या दोघांच्या कुंटुबियांची भेट घेण्यासाठी खास काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
संसदेत राज्यघटनेच्या स्वीकृतीला ७५ वर्षे पूर्ण झाल्या पार्श्वभूमीवर लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहात राज्यघटनेबाबत चर्चा झाली. या ७५ वर्षात राज्यघटनेतील तरतूदी आणि त्यांचा वापर याशिवाय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान कोणी केला यावरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. त्यानंतर भाजपाच्या खासदारांकडून काँग्रेस नेते आणि खासदारांना लक्ष्य करण्याचा प्रयत्नही यावेळी करण्यात आला. त्याविषयीचा इतिहास ताजा आहे.
नेमके याच कालावधीत राज्यातल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात परभणीत राज्य घटनेची विटंबना झाली म्हणून दलित कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. वास्तविक या हिंसक आंदोलनाची सुरुवात काही परभणीबाहेरून आलेल्या टोळक्याकडून केल्याचे काही स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र घटनेत एलएलबी करत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशी याला पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणातील पोलिसांची भूमिका आणि स्थानिक प्रशासनाची भूमिका संशय निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाली म्हणून संसदेत चर्चा होते. तर दुसऱ्याबाजूला राज्यघटनेच्या विटंबनेच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सुर्यवंशी या तरूणाची पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू होतो या दोन्ही घटना परस्पर विरोधी भासी आहेत. त्यामुळे याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता काँग्रेस नेते राहुल गांधी हे परभणीत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
त्यानंतर बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याने तेथेही वास्तव परिस्थिती आणि राज्यघटनेतील तरतूदीबाबत विरोधाभासी चित्र निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर परभणीनंतर राहुल गांधी मस्साजोग येथील संतोष सुर्यवंशी याच्या कुटुंबियांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च घेत असल्याचे जाहिर करत आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. तर परभणीत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे जाणून घेतले. तसेच संबधित पोलिस कर्मचारी-अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शरद पवार यांनी केली.
शरद पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्या कुंटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी हे भेट घेण्यासाठी येत आहेत. त्यामुळे दोन्ही घटनावरून राज्य सरकार पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात आले आहे.
Marathi e-Batmya