राहुल शेवाळे यांचे वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर, येत्या २३ जानेवारीला मोठा राजकीय भूकंप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा २३ जानेवारीला मुंबईत सत्कार सोहळा

शिवसेना मंत्री उदय सामंत यांच्यावर विरोधकांनी केलेल्या आरोपांबाबत उत्तर देताना राहुल शेवाळे म्हणाले की, उबाठाचे १५ आणि काँग्रेसचे १० आमदार शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक असून येत्या २३ जानेवारी रोजी मोठा राजकीय भूकंप होईल. त्यामुळे धास्तावलेले विरोधक शिवसेनेबाबत खोट्या बातम्या पसरवत आहेत. उदय कोणाचा होणार यावर चर्चा करण्यापेक्षा उबाठा गटाच्या अस्ताबाबत काळजी करावी, अशी घणाघाती टीकाही यावेळी संजय राऊतांवर केली.

पुढे बोलताना राहुल शेवाळे म्हणाले की, महाविकास आघाडी ही स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी झाली होती. ज्यावेळी सत्ता जाते आणि स्वार्थ दिसून येत नाही तेव्हा त्यात बिघाडी झाल्याचे दिसून येते. स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि परिवाराला वाचवण्यासाठी काही पक्षांचे प्रमुख हातपाय पसरताना दिसत आहेत, अशी टीकाही यावेळी केली.

राहुल शेवाळे म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबवून अडीच कोटी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारे लाडके भाऊ शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाडक्या बहिणींच्या हस्ते भव्य नागरी सत्कार होणार आहे. हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी शिवसेनेकडून वांद्रे कुर्ला संकुल येथे हा सत्कार सोहळा आयोजित केल्याचेही यावेळी सांगितले.

शिवसेना उपनेते राहुल शेवाळे बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सचिव सुशांत शेलार, उपनेत्या व प्रवक्त्या शीतल म्हात्रे, प्रवक्त्या अ‍ॅड सुशीबेन शहा, युवासेना सरचिटणीस अमेय घोले उपस्थित होते.

पुढे बोलताना राहुल शेवाळे म्हणाले की, जून २०२२ मध्ये शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक निर्णय घेत वंदनीय बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा संकल्प केला होता. तो संकल्प लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पूर्ण झाला. त्यामुळे शिवसैनिक आणि राज्यातील तमाम नागरिकांच्या वतीने एकनाथ शिंदे आणि निवडून आलेल्या सर्व आमदार आणि खासदारांचा भव्य नागरी सत्कार केला जाणार आहे.

राहुल शेवाळे पुढे बोलताना म्हणाले की, शिंदे साहेबांच्या नेतृत्वात लोकसभेत शिवसेनेचे ७ खासदार निवडून आले तर विधानसभेत शिवसेनेचे ५७ आमदार निवडून आले. विधानसभेत शिवसेनेला उबाठाच्या तुलनेत १५ लाख ६३ हजार ९१७ जास्त मते मिळाली. राज्यातील मतदारांनी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, पक्षाने हा विजय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना समर्पित केला. महायुतीच्या विजयात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे. त्या लाडक्या बहिणींच्या हस्ते एकनाथ शिंदे आणि शिवसेना मंत्र्यांचा सत्कार होईल. यावेळी सोनू निगम व अवधूत गुप्ते यांचा देखील सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना राहुल शेवाळे म्हणाले की, शिवसेना आणि मुंबई महापालिकेचे भावनिक नातं आहे. मुंबईकरांनी नेहमीच शिवसेनेला धनुष्यबाणाला मतदान करुन शिवसेनेचा महापौर निवडून दिला आहे. पुन्हा मुंबई महापालिकेवर भगवा फडकवून महायुतीचा महापौर करण्याचा संकल्प शिवसेनेकडून येत्या २३ जानेवारी रोजी केला जाईल, या संकल्पपूर्तीसाठी २४ जानेवारी ते ३० जानेवारी दरम्यान मुंबई शहरात शाखानिहाय बैठका घेण्यात येतील. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबई शहरात नवीन कार्यकारिणीची घोषणा केली जाईल. या कार्यकारिणीच्या माध्यमातून महापालिकेची निवडणूक लढवली जाईल, असेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना राहुल शेवाळे म्हणाले की, ९ फेब्रुवारी रोजी पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने पक्षाकडून २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या सदस्य नोंदणी मोहीम आणि मतदारांचे आभार मानण्यासाठी जिल्हानिहाय सभा आयोजित केल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *