चोराने चोरलेला मुद्देमाल परत केला तरी कारवाई होणार, पण चोरी केलेल्या चोरावर काहीच कारवाई होत नसल्याचा घणाघात शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब यांनी आज पत्रकार परिषदेत केला. अनिल परब यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशात राज्य मंत्रिमंडळातील राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे डान्स बार असल्याचा आणि तो अद्यापही सुरु असल्याचा आरोप केला होता. त्यावर राज्य मंत्री योगेश कदम यांनी या आरोपावर योग्यवेळी उत्तर देणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र योगेश कदम यांनी स्पष्टीकरण देण्यापूर्वीच माजी आमदार आणि योगेश कदम यांचे वडील रामदास कदम यांनी तो बार त्यांच्या पत्नीच्याच नावे असल्याचा खुलासा केला.
अनिल परब पुढे बोलताना म्हणाले की, या प्रकरणात सगळं काही सुस्पष्ट असताना कारवाई करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हतबल दिसत होते. सावली बार संदर्भातील कारवाई वेळीच झाली नाही तर आपण न्यायालयात जाणार असल्याचा इशारा देत आपण योगेश कदम यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे. त्याच बरोबर माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट,संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर आपण ठाम असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.
पुढे बोलताना अनिल परब म्हणाले की, मंत्री पदावर असताना आपण काहीही करु शकतो, हा त्यांचा जो काही माज आहे ते योग्य नाही ते फार काळ रहात नाही असा खोचक टोलाही यावेळी लगावला.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यात रामदास कदम आणि त्याचे पुत्र गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावे असलेल्या कांदीवली येथील सावली बारने राजकीय वादाचा बार उडवला असतानाच आता या सावली बारमधील ऑर्केस्ट्राची अर्थात डान्सबारची मान्यता रद्द करण्यात आली. डान्स बारचा परवाना त्यांनी परत केल्याचे सांगितले जाते. पण त्यामुळे कारवाई होत नाही असे नाही. सरकारला कारवाई करावीच लागेल
आता सावली बारमधील ऑर्केस्ट्राची डान्सबारची मान्यता रद्द करण्यात आली आहे. परंतु ऑर्केस्ट्राचा परवाना आपण परत करीत असल्याचे रामदास कदम यांच्याकडून सांगण्यात येत आहे. बारमधील ऑर्केस्ट्राची मान्यता पोलिस देतात परंतु नियमांचा भंग झाल्याने ही मान्यता पोलिसांनी रद्द केल्याचे समोर आले आहे. तसेच जेवण आणि मद्य सेवा देण्यास दोन महिने बंदी घालण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या नियमानुसार १५ दिवस ते २ महिने बार पुर्णतः बंदचे आदेश काढले जात आहेत. यानुसार बारची पुर्ण मान्यता रद्द होणे हा प्रक्रिया अजून पूर्ण झाली नसून बारचा गुमास्ता, अन्न औषध परवाना, मद्य परवाना हे अजुन रद्द झाले नसल्याचे समोर आले आहे.
अनिल परब यांनी काल विभागातील समतानगर पोलिसांची भेट घेतली होती. राज्य सरकारच्या दबावाखाली पोलिस कारवाई करत नसल्याचा आरोप यावेळी केला. जर वेळीच कारवाई केली नाहीतर आपण न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचा इशारा अनिल परब यांनी दिला. त्यानंतर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला. त्यानंतर रामदास कदमांकडून सावली बारमधील ऑर्केस्ट्रा परवाना परत घेण्यात आला.
Marathi e-Batmya