Breaking News

शिंदेच्या बंडावर शरद पवार पहिल्यांदाच म्हणाले, कोणता राष्ट्रीय पक्ष हे सांगायची गरज नाही… राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर पहिल्याच शरद पवार यांनी जाहिर केली भूमिका

शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे अल्पमतात आलेले महाविकास आघाडी सरकार कसे वाचावायचे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पक्षाच्या नेत्यांची आज बैठक बोलावली. या बैठकीत राज्यातील सध्याच्या राजकिय संकटावर मात करण्याबाबत चर्चा करत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यामागे उभे राहण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला. त्यानंतर पक्षाच्या झालेल्या बैठकीतील निर्णयाची माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या व्हिडिओचा संदर्भ देत, देशात प्रमुख ६ राष्ट्रीय पक्ष आहेत. या राष्ट्रीय पक्षांपैकी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा आणि भारतीय जनता पार्टी हे आहेत. या पक्षांकडे पाहिल्यानंतर यापैकी कोणत्या पक्षाची ताकद बंडखोर शिवसेनेच्या आमदारांमागे आहे हे वेगळं सागांयची गरज नसल्याचे सांगत या सगळ्या मागे भाजपाच असल्याचे सूचक विधान केले.

नरिमन पाँईट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे हे ही उपस्थित होते.

शरद पवार यांना अजित पवारांनी एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपा असल्याचं वाटत नाही असं म्हटल्याचं सांगत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले की, अजित पवार यांनी फक्त मुंबईमधील परिस्थिती पाहून वक्तव्य केलेलं असावं. त्यांना राज्याबाहेरची परिस्थिती माहिती नाही. ती आम्हाला माहीत आहे. आपण एकनाथ शिंदेचा एक व्हिडीओ पाहिला ज्यामध्ये त्यांनी आम्हाला एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे असं सांगितले आहे.

पवारांनी निवडणूक आयोगानुसार राष्ट्रीय पक्ष कोणते आहेत याची यादी वाचून दाखवली. त्यामध्ये भाजपा, मायावती, सीपीआय, सीपीआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी ही नावं घेतली. भाजपाचे गुजरात राज्याचे अध्यक्ष पाटील हे मराठी व्यक्ती असून यांचा सहभाग असेल याचा अर्थ काय समजायचा? आसाममध्ये संपूर्ण व्यवस्था करण्यामध्ये तेथील राज्य सरकार अतिशय सक्रीय आहे. तिथलं राज्य सध्या भाजपाच्या हातात आहे. नावं घ्यायची गरज नाही. तिथं जे दिसतय त्यावरुन कोण आहे हे कळतंय असे म्हणत सूचक विधान केले.

अजित पवारांपेक्षा आपल्याला गुवहाटी आणि राज्याबाहेरील राजकारणाची अधिक माहिती असून शिवसेनेचे बंडखोर आमदार पुन्हा मुंबईत येतील तेव्हा ते नक्कीच उध्दव ठाकरेंचे नेतृत्व स्विकारतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जे आमदार गुवाहाटीला गेले आहेत, त्यातील अनेक आमदारांवर केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे किंवा होती. त्याचा परिणाम त्यांच्या निर्णयावर झाला नसेल असे म्हणता येणार नाही. तसेच या आमदारांना अडीच वर्ष सत्तेत असताना हिंदुत्वाचा मुद्दा अडचणीचा ठरला नव्हता. आज जेव्हा सरकारविरोधात जाण्याची संधी मिळाली तेव्हा हिंदुत्वाचे फक्त कारण पुढे केले जात आहे, त्यापेक्षा अधिक काही नाही, असे मला वाटते असेही ते यावेळी म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत