मुघल शासक औरंगजेबाच्या उद्दातीकरण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांना सध्या सुरू असेलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या संपूर्ण कालावधीसाठी विधानसभा सदस्यत्व निलंबित केले. महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ मार्च रोजी संपेल. दोन दिवसांपूर्वी आझमी यांनी औरंगजेबाचे वर्णन एक उत्कृष्ट प्रशासक असे केले होते; या टिप्पणीमुळे मोठा वाद निर्माण झाला. मंगळवारी या मुद्द्यावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मोठा गोंधळ झाला. गोंधळादरम्यान, सत्ताधारी पक्षाचे सदस्य अबू आझमी यांना निलंबित करण्याची मागणी केली होती.
बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर सांसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत अबू असीम आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव मांडताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, माध्यमांशी बोलताना अबू आझमी यांनी औरंगजेबाचे वर्णन एक उत्कृष्ट प्रशासक असे केले होते. त्यांनी औरंगजेबाला चांगला माणूस म्हणताना छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यांचे विधान आक्षेपार्ह आणि निषेधार्ह आहे. यामुळे सभागृहाचा अनादर झाला आहे. आझामी यांनी विधानसभेची प्रतिमा मलिन केली आहे. अशा परिस्थितीत, विधानसभेत असा प्रस्ताव आणला जातो की अबु आझमी यांचे सदस्यत्व अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत निलंबित करावे. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा प्रस्ताव मतदानास टाकला. त्यावेळी या प्रस्तावास सत्ताधारी सदस्यांसह विरोधी पक्षातील काँग्रेसच्या सदस्यांनीही प्रस्तावाच्या बाजूने आपली भूमिका दर्शविली. त्यानंतर विधानसभेत अबु आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.
त्यामुळे अर्थसंकल्पिय अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी यापुढे अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होऊ शकणार नाहीत आणि अधिवेशनाच्या कालावधीत विधान भवन परिसरात त्यांचा प्रवेश बंदी असेल. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडलेल्या प्रस्तावावर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक भूमिका मांडत बोलताना म्हणाले की, अबू आझमी यांचे निलंबन फक्त या अधिवेशनात पुरते मर्यादित का आहे? या प्रकरणी एक समिती स्थापन करावी आणि निलंबनाचा कालावधी वाढवावा, अशी मागणी केली.
त्यावर, संसदीय कामकाज मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत सांगितले की, अधिवेशन कालावधी संपल्यानंतर निलंबन चालू राहू शकत नाही.
अबु आझमी नेमके काय म्हणाले?
एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना अबु आझमी म्हणाले होते की, औरंगजेबाच्या कारकिर्दीत भारताच्या सीमा अफगाणिस्तान आणि बर्मा (म्यानमार) पर्यंत पोहोचल्या होत्या. आपले सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) जागतिक सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या २४ टक्के होता आणि भारताला (औरंगजेबाच्या कारकिर्दीत) सोन्याचा पक्षी म्हटले जात असे. या विधानाच्या दुसऱ्या दिवशी, आझमी म्हणाले की त्यांनी औरंगजेबाबद्दल जे काही सांगितले होते ते इतिहासकार आणि लेखकांनी नमूद केले आहे. मी शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा कोणत्याही राष्ट्रीय व्यक्तिमत्व विरुद्ध कोणतेही अपमानजनक विधान केलेले नाही. तरीसुद्धा, जर माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावले असेल तर मी माझे विधान मागे घेतो असे जाहिर केले होते.
Marathi e-Batmya