संजय राऊत यांचा हल्लाबोल, सगळी सुरक्षा गद्दारांच्या…. आम्ही बोललो तर भूकंप होईल विरोधकांना मिळत असलेल्या धमक्या सरकार गांभीर्याने घेत नाही

संजय राऊतांना शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या मोबाईल फोनवर धमकीचा मेसेज आल्याची माहिती पुढे आल्यानंतर त्यांनी धमकीप्रकरणी पोलिसांत रीतसर तक्रारही दाखल केली. लॉरेन्स बिष्णोई गँगच्या नावाने ही धमकी देण्यात येत असल्याचं मोबईलवर आलेल्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच, दिल्लीत एके ४७ रायफलने गोळ्या घालण्याची धमकी मेसेजमध्ये देण्यात आली आहे. याप्रकरणी संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटावरही निशाणा साधला.

यासंदर्भात संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, धमक्या येत असतात. पण विरोधकांना आलेल्या धमक्या सध्याचं सरकार गांभीर्यानं घेत नाही. सगळी सुरक्षा व्यवस्था गद्दार गटाचे आमदार, खासदार, पदाधिकारी यांच्यासाठी लावल्यामुळे महाराष्ट्रातली कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे ढेपाळली असल्याची खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केली.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, मुंबईसह महाराष्ट्रात होणाऱ्या दंगली, महिलांवर होणारे अत्याचार अशा गोष्टी आपण पाहात आहोत. पोलिस अधिकारी वैभव कदम यांनी केलेली आत्महत्या असे प्रकार रोज घडत आहेत. पण राज्याच्या मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना त्याकडे पाहायला वेळ नाही. आम्हाला आलेल्या धमक्यांची माहिती जेव्हा आम्ही देतो, तेव्हा गृहमंत्री त्याची चेष्टा करतात की हा स्टंट आहे, अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली.

तसेच संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले, आम्हाला आलेल्या धमक्यांची माहिती जेव्हा आम्ही देतो, तेव्हा गृहमंत्री त्याची चेष्टा करतात. हा स्टंट आहे असं म्हणतात. मग तुमच्या घरात होतो तो स्टंट नाही का? तुम्ही त्यासाठी एसआयटी स्थापन करता. लोकांना पकडून घेऊन येता. तो तर सगळ्यात मोठा स्टंट आहे. खरं काय आहे, ते आम्हाला माहिती आहे. पण आम्हाला मर्यादा राखायची आहे. तुम्हाला आमच्या कुटुंबाची काळजी नाहीये. विरोधकही माणसंच आहेत. त्यांनाही कुटुंबं आहेत. तेही सामाजिक जीवनात वावरत असतात. पण लक्षात घ्या, सत्ता आज आहे, उद्या नाही. पारडं कधीही बदलू शकतं. मी जर खरं बोललो, तर भूकंप होईल, असा इशाराही दिला.

यावेळी संजय राऊत यांनी सांगितले की, मला कळलंय की सलमान खानला ज्यांनी धमकी दिली, त्याच गँगच्या माध्यमातून धमकी आली आहे. त्यातल्या काहींना पकडलंय असंही माझ्यापर्यंत आलंय. असं झालं असेल, तर त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे, असं म्हणत पोलिसांचे आभारही मानले.

संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले, ठाण्यातल्या एका गुंड टोळीच्या म्होरक्यानं मला धमकी दिली होती. ज्यात मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाचंही नाव आहे. पण ती तुम्ही गांभीर्यानं घेतली नाही. काल मला आलेली धमकी पोलिसांना कळवायचं काम मी केलं आहे. त्याचा मला राजकीय मुद्दा करायचा नाहीये. पोलिस यंत्रणा फक्त विरोधकांवर खोट्या कारवाया करण्यासाठी वापरली जातेय. असंच चालू राहू द्या, आम्ही आहे त्या परिस्थितीला सामोरे जाऊ, असा उपरोधिक टोलाही लगावला.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *