मुंबई: प्रतिनिधी
राज्यात एकाबाजूला कोरोनामुळे सर्वच गोष्टी बंद असताना अनेक महाविद्यायांच्या इमारती, तेथील वसतिगृहे रूग्णांवरील उपचारांसाठी सरकारनेच ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे महाविद्यालये पुन्हा कधी सुरू होतील याची कोणतीही शाश्वती नसताना अनेक महाविद्यालयांनी मात्र फि वसूली करण्यास सुरुवात केली असून राज्यातील SC-ST च्या विद्यार्थ्यांकडून निर्धारीत केलेल्या फि पेक्षा वाढीव फि महाविद्यालयांनी वसुल करण्यास सुरु केल्याने या अशा महाविद्यालयांवर सामाजिक न्याय विभागाने कारवाई करावी अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनने एका निवेदनाद्वारे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, विभागाच्या सचिवांकडे केली.
कोविड -19 च्या या काळात सध्या महाराष्ट्रातील जनतेला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शैक्षणिक, सामाजिक , आर्थिक आणि राजकीय अश्या सर्वच क्षेत्रातील कामे ठप्प झाली आहेत. त्यातून शेतकऱ्यांची आणि विद्यार्थ्यांची तर फारच गैरसोय होत आहे. कोविड मध्ये शाळा- महाविद्यालयांचे कोविड केंद्रात रूपांतर, रखडलेल्या परीक्षा, अर्धवट झालेले अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांचे निकाल, या सर्वच विषयांवर भ्रम पसरलेला आहे. त्यातून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी च अनेक शाळा- महाविद्यालयांनी फी आकारण्यास सुरवात केली आहे. विद्यापीठाने ही एक सर्क्युलर काढून लवकरात लवकर फी भरावी असे जाहीर केले. मात्र लॉकडाऊन मध्ये बेरोजगारीमुळे फि भरणे विद्यार्थ्यांना शक्य नसल्याचे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे मुंबई सचिव कॉ. अमीर काझी आणि अमर एकाड यांनी पत्राद्वारे सरकारच्या निदर्शनास आणून दिले.
मुंबई विद्यापीठाने २००८ मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत मिळणे गरजेचे आहे. परंतु अनेक महाविद्यालयानी सन २००८-o९ ते आजपर्यंत मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त फी आकारली आहे. मुळात सवलत मिळण्याचा हक्क असताना देखील ते भरमसाठ फी भरत आहेत. या गंभीर विषयाकडे लक्ष देता, मुंबई विद्यापीठाशी संबंधित महाविद्यालयांचे ऑडिट करून मागासवर्गीय विद्यार्थ्याकडून घेण्यात आलेले अतिरिक्त शुल्क त्वरित त्यांना परत करावे व संबंधित महाविद्यालयावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी एसएफआयएफने केली.
या मागणीचे निवेदन ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) या विद्यार्थी संघटनेने सामाजिक न्याय मंत्री धनजंय मुंडे , मा. सचिव सामाजिक न्याय विभाग तसेच आयुक्त समाजकल्याण पुणे यांना मेलद्वारे पाठवले आहे. सदर निवेदनाची दखल न घेतल्यास ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने महाराष्ट्रभर विविध विद्यापीठांतून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा AISF च्या राज्य सहसचिव कॉ.अंजली आव्हाड, मुंबई सचिव कॉ.आमीर काजी व अमर एकाड यांनी दिला.
Marathi e-Batmya