परदेश शिष्यवृत्तीच्या नियमात केला हा बदल आता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना मिळणार लाभ- सामाजिक न्याय मंत्री मुंडे

मुंबई : प्रतिनिधी
सामाजिक न्याय विभागांतर्गत परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या नियमात अंशतः बदल करण्यात आला असून, यानुसार आता योजनेचे लाभार्थी म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव लाभ नाकारल्यास निवड सुचीतील प्रतीक्षा यादीतील पुढील पात्र विद्यार्थ्यांला परदेश शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकेल. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी हा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे.
परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्चशिक्षण घेत असलेल्या ७५ विद्यार्थ्यांना विशेष निवड प्रक्रियेद्वारे या योजनेचा लाभ देण्यात येतो. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाची देखील याच प्रकारची शिष्यवृत्ती योजना आहे. बऱ्याचदा विद्यार्थी दोन्हीही योजनांच्या लाभासाठी अर्ज करतात. परंतु, निवड झाल्यानंतर नियमानुसार त्यांना कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता येतो.
अशा वेळी बऱ्याचदा विद्यार्थी केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतात. २००३-०४ पासून सुरू असलेल्या या योजनेत लागू असलेल्या नियमावलीनुसार राज्य सरकारच्या योजनेसाठी अंतिम निवड झालेल्या एखाद्या विद्यार्थ्याने ऐनवेळी अशा कारणांनी लाभ नाकारल्यास ती जागा रिक्त राहत असे, पर्यायाने काही विद्यार्थी पात्र असूनही योजनेच्या लाभांपासून वंचित राहत असत.
सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात रिक्त झालेल्या जागांवर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड करावी अशी मागणी करत काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु नियमावलीत तशी तरतूद नसल्याने न्यायालयाने प्रकरण निकाली काढले.
मात्र, विद्यार्थ्यांच्या हित व मागणीचा विचार करत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सदर योजनेच्या नियमात अंशतः बदल करण्याचा निर्णय घेतला. आता एखाद्या विद्यार्थ्याने अंतिम निवड झाल्यानंतर जर योजनेचा लाभ नाकारला तर त्याजागी निवड सूचीतील प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारास क्यूएसवर्ल्ड रॅकींगनुसार गुणानुक्रमे या योजनेचा लाभ देण्यात येईल व योजनेचा कोटा १००% पूर्ण करण्यात येईल.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची माहिती, मुंबईत मराठीसाठी लवकरच स्वतंत्र चित्रनाट्यगृह उभारणार १६४ मराठी चित्रपटांना २४ कोटी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य

दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत ऑक्टोबर २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत परीक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *