मुंबईः खंडूराज गायकवाड
विधानसभा निवडणूकीचे निकाल लागून दहा दिवस होत आहेत. मात्र राज्यात सत्ता स्थापनेवरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्री पदावरून सत्ता संघर्षाचा तिढा कायम आहे. मात्र शिवसेनेच्या ताणाताणीला आणि भाजप-सेनेतील कलगीतुऱ्याच्या राजकीय घडामोडी मागे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व्हेसर्वा शरद पवार हेच केंद्रस्थानी आल्याचे पुढे आल्याने राज्यातील राजकारणात शरद पवारच पॉवरफुल असल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेनेला कौल दिलेला आहे. तरीही सत्तेच्या समसमान वाटपाची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. त्यानुसार अडीच -अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचे वाटप व्हावे या फॉर्मूल्यावर शिवसेना ठाम आहे. मात्र निकाल हाती येताच भाजपाकडून समसमान वाटपाऐवजी काही खाती सोडायची तयारी दाखविली. पण मुख्यमंत्री पदाबाबत भाजप कोणत्याही प्रकारे तडजोड करायला तयार नाही. त्यामुळे अजून काही दिवस तरी कोणाचे सरकार स्थापन होईल याचे चित्र स्पष्ट होताना दिसत नाही. परंतु हा सर्व राजकीय पोरखेळ सुरु असताना,शरद पवारांनी आता आपले राजकीय फासे टाकायला सुरुवात केली असून येत्या दोन दिवसात पवार काय भूमिका घेतात,यावरच भाजप-शिवसेनेचे सरकार तरणार की अल्पकाल ठरणार दिसणार आहे.
अवकाळी पावसामुळे पीकाची झालेल्या नुकसानीची पाहणी करून शरद पवार आज २ नोव्हेंबर रोजी तातडीने नाशिकहून मुंबईला रवाना झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या सिल्ह्वर ओक येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या नेत्याची बैठक बोलाविली होती.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पुढची राजकीय रणनीती काय असावी. शिवसेनेसोबत सत्तास्थापन करायचे कि नाही,याबाबत राजकीय चर्चा करण्यासाठी पवार सोमवारी काँग्रेसच्या राष्ट्रीय पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत. संपूर्ण विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीकेचा रोख ठेवल्याने याची सल कुठे तरी पवार यांच्या मनात आहे,म्हणून जेवढे ताणता येईल,तेवढा राजकीय खेळ रंगणार आहे. हे त्यांना माहित असल्याने त्यांनी आपला या राजकीय खेळास
हातभार लावला आहे.
त्यातच राज्यातील सत्ता स्थापनेपासून भाजपाला रोखण्यासाठी सर्वात आधी काँग्रेस पक्षाकडून पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली. तसेच यासंदर्भात शरद पवार यांची भेट घेत याबाबत चर्चाही केली. त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हे पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या बंगल्यावर गेले. त्यामुळे भाजपा-शिवसेनेच्या सत्ता स्थापनेतही पवारांची राजकिय नीती वरचढ ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. याशिवाय शिवसेनेकडूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रणनीतीवरच स्वतःची राजकिय खेळी खेळत आहे. त्यामुळ पवार काय राजकिय खेळी खेळतात याकडेच संपूर्ण राजकिय पक्षांबरोबरच जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
Marathi e-Batmya