बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भेट घेतल्यानंतर पवार यांनी परभणीतील पोलिसांच्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेला सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुबिंयाची भेट घेतली. तसेच त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना न्याय मिळवून देण्याबाबत धीर दिला.
शरद पवार यांनी सोमनाथ सुर्यवंशी यांच्याकुटुंबियांची भेट घेतल्यानंतर झालेल्या घटनेबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सोमनाथ सुर्यवंशीच्या भावाने सांगितले की, सोमनाथ सुर्यवंशी यास कोणत्याही प्रकारचे व्यसन नव्हते. तसेच तो कायद्याच्या अर्थात लॉ करत होता. सोमनाथ यास पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यासंदर्भातील कोणतीच माहिती आम्हाला दिली नाही. त्याशिवाय त्याचा मृत्यू झाल्यानंतर आम्हाला पोलिसांनी कळविले. त्यावेळी पोलिसांनी सांगितले की, सोमनाथला हार्ट अॅटक आल्याने त्याचे निधन झाले आहे. त्यामुळे त्याची बॉडी एक पुण्याला न्या किंवा औरंगाबादला न्या. आणि औरंगाबादला नेत असाल तर तेथील आयजीला तुम्ही भेटून पुढे जा असे, तसेच पोलिस भरतीच्या वेळी आम्ही तुला मदत करू असे आम्हाला सांगितले.
सोमनाथच्या भावाने पुढे बोलताना सांगितले की, आम्ही सोमनाथचा मृतदेह घेऊन औरंगाबादला गेलो. तिकडे जाताना आम्ही आयजीला भेटलो. त्यावेळी तेथील जे आयजी होते त्यांनी आम्हाला सगळा घटनाक्रम सांगितला आणि सोमनाथचा मृत्यू हा हार्ट अॅटकने झाल्याचे सांगितले. तेथून आम्ही औरंगाबादला पोहचल्यानंतर सोमनाथ सुर्यवंशीच्या अंगावर मारहाणीचे वळ असल्याचे दिसून आले. त्यानंतर आम्ही परभणी कडे येत असताना परभणीच्या जवळ मोठ्या प्रमाणावर पोलिसांनी आम्हाला रस्त्यातच अडवले. आणि सांगितले की, परभणीत मोठ्या प्रमाणावर लोक जमले आहेत तर तुम्ही सोमनाथचा मृतदेह परभणीला नका नेऊ त्यापेक्षा पुण्याला न्या तेथे आम्ही जागा उपलब्ध करून देतो असे सांगण्यात आले.
त्यावेळी एका महिला पोलिस अधिकारी पुढे येऊन म्हणाली की, तुम्ही जर सोमनाथचा मृतदेह परभणीला नेलात आणि काही बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी तुमच्यावर राहिलं असे सांगत एकप्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही पार्थिव घेऊन परभणीत आलो. मात्र पोलिस सांगतात की, सोमनाथला दगडफेक करताना अटक केली. मात्र त्यास अटक केल्यानंतर आम्हाला कळवलं नाही की त्याची कल्पनाही दिली नाही. उलट त्याचे निधन झाल्यानंतर आम्हाला कळविण्यात आलं. पण सोमनाथ हा एलएलबीच्या शेवटच्या वर्षाला होता. २१ तारखेपासून त्याची परिक्षा होती. परिक्षा असल्याने मारू नका असेही अन्य एका व्यक्तीने यावेळी सांगितले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल डजे सांगितले ते सर्व खोटं असून त्यांनी जाहिर केलेली मदतही आम्हाला मान्य नसल्याचेही यावेळी सांगितले.
यावेळी सोमनाथ सुर्यवंशीच्या आईने सांगितले की, माझ्या मुलाला अटक केली, मात्र त्याची माहिती त्यांनी मला कळविली नाही. माझ्या सोन्यासारख्या मुलाला अटक केली आणि त्याचे निधन झाल्यानंतर पोलिसांकडून सांगण्यात आलं. त्या दिवशी जे कोणी पोलिस कामावर हजर होते त्यासर्वांवर कारवाई करावी अशी मागणी करत पुन्हा एखाद्या गरीबाच्या मुलाचा कोणी जीव घेऊ नये यासाठी हा न्याय द्यावा अशी मागणीही शरद पवार यांच्यासमोर आपली व्यथा मांडताना केली.
यावेळी शरद पवार यांनी त्यांच्या कुटुंबियांना विचारले की सोमनाथची बॉडीवर कपडे होते का, त्याच्या अंगावर वळ होते का, त्यावर सोमनाथच्या कुटुंबियांनी होय असे सांगत सोमनाथच्या सर्वांगावर मारण्याचे वळ होते. तसेच त्याच्या चेहऱ्यावरही मारहाणीचे वळ होते.
कुटुंबियांशी संवाद साधल्यानंतर शरद पवार यांनी याप्रकरणी लवकरच राज्य सरकारची भेट घेऊन पुन्हा यासंदर्भात न्याय देण्याची मागणी करू. तसेच याप्रकरणी जे कोणी सहभागी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही यावेळी केली.
Marathi e-Batmya