मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील सत्ता स्थापनेचा घोळ संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली असून आज संध्याकाळपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेना सरकारला पाठिंबा देण्याबाबतची अधिकृत घोषणेची शक्यता आहे. काँग्रेसकडून भूमिका जाहीर झाल्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंबा जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. त्यानंतर राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाशिवआघाडी जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सकाळी १० वाजता काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत बैठक झाली. याबैठकीत राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच राज्यातील काँग्रेस आमदारांचा शिवसेना पाठिंबा देण्याबाबत असलेला कल लक्षात घेवून पुन्हा एकदा राज्यातील प्रमुख नेत्यांचे मत जाणून घेण्यासाठी पुन्हा संध्याकाळी ४ वाजता बैठक होणार आहे. त्यानंतर काँग्रेसकडून भूमिका जाहीर करण्यात येणार असल्याचे संसदेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी नवी दिल्लीत सांगितले.
काँग्रेसने आपली अंतिम भूमिका संध्याकाळी जाहीर करणार असल्याने राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या भूमिकेनंतर भूमिका जाहीर करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ठरविल्याची माहिती नवाब मलिक यांनी सांगितले.
तसेच संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत राज्यपालांनी शिवसेनेला सरकार स्थापन करण्याबाबत दावा करण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे तत्पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचे पत्र देत राज्यातील तिढा सोडविण्यात येणार असल्याचे काँग्रेसमधील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
Marathi e-Batmya