मंत्रिमंडळात घेऊ नये म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांकडे हट्ट नारायण राणे यांचा दावा

मुंबई: प्रतिनिधी

आपल्या राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशामुळे शिवसेना घाबरली असून आपल्याला मंत्रिमंडळात घेऊ नये म्हणून शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे अट्टाहास चालविला आहे. परंतु, मी मंत्रिमंडळात असलो काय, नसलो काय, आपली ताकद कमी होणार नाही, असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले.

कोकणातील नाणार प्रकल्पाला विरोध करणे हा शिवसेनेचा देखावा आहे. नाणार प्रकल्प झाला तर शिवसेना कोकणातून हद्दपार होईल, याची त्यांना भीती आहे. त्यामुळेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार, मंत्री यांच्यासह गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध होता तर मग त्यांचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी त्याला परवानग्या कशा दिल्या, असा सवालही त्यांनी केला. नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ९५ टक्के लोकांची पत्रे आपल्याकडे आहेत. शिवसेना कसली पत्रे देणार, त्यांनी फक्त देखावा चालविला आहे, असेही ते म्हणाले.

मंत्रालयात वारंवार आत्महत्त्या होणे सरकारला भूषणावह नाही. सरकारने यावर गांभीर्याने विचार करायला हवा. आपल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची राज्यभर संघटनात्मक बांधणी सुरू असून आहे. येत्या दोन महिन्यात पक्षाचे तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, अशा पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या जातील, असेही राणे यांनी सांगितले.

 

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा, लॉकडाऊनच्या अफवा पसरवल्यास फौजदारी कारवाई पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा उपलब्ध

अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता जागतिक स्तरावर दिसू लागला आहे. कच्चे तेल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *