मुंबईः प्रतिनिधी
मागील काही वर्षांपासून रखडलेल्या राम मंदीर प्रश्नी एक नेता अयोध्येत गेला होता. तेथे त्यांनी उगीचच मोठमोठ्या गोष्टी अर्थात बडबोलेपणा केल्याची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील सभेत सांगितली. त्यामुळे राज्यातील तो “बडबोले नेता” कोण अशी चर्चा राजकिय वर्तुळात सुरू झाली.
लोकसभा निवडणूकीपूर्वी युतीतील शिवसेना आणि भाजपामध्ये जागा वाटपावरून तणाव झाल्याने शिवसेनेने भाजपावर राजकिय कुरघोडी करण्याच्या अनुषंगाने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अयोध्या दौरा केला होता. तसेच अयोध्येत जावून राम मंदीर कधी उभारणार ? अशी विचारणा करत केंद्रात सत्तेवर असताना राम मंदीरासाठी अध्यादेश का काढत नाही? असा सवालही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला होता. त्यावेळी भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्याकडून शांत राहणेच पसंत केले होते.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशिवाय अन्य कोणत्याही राजकिय पक्ष किंवा त्यांचा नेता अयोध्येत राम मंदीर प्रश्नी गेला नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या लेखी “बडबोले नेते” म्हणून उध्दव ठाकरे तर नाही ना अशी विचारणा राजकिय वर्तुळात सुरू झाली.
Marathi e-Batmya