शिवसेना उबाठा आक्रमकः मुंबईत मराठी बोललीच पाहिजे आरएसएसच्या भैय्याजी जोशी यांच्या त्या वक्तव्याचे विधानसभेत पडसाद

महाराष्ट्राची राजधानी देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत अनेक बोली भाषा बोलल्या जातात. मात्र मुंबईत रहायचे तर मराठी भाषा आलीच पाहिजे असा कायदा महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असताना करण्यात आला होता. मात्र आरएसएसचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी नुकतेच मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकलंच पाहिजे असं काही नाही असे वक्तव्य केले. त्यावरून राजकीय वर्तुळात एकच गहजब झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद विधिमंडळाच्या विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहात उमटले.

विधानसभेत या विषयीचा मुद्दा शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांनी हा मुद्दा उपस्थित करत सरकारवर हल्लाबोल चढविला. यावेळी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, भैय्याजी जोशी यांनी काल विद्याविहार येथील एका कार्यक्रमात बोलताना मुंबईत येणाऱ्या व्यक्तीला मराठी भाषा आलीच पाहिजे असे काही नाही असे वक्तव्य केले. एका बाजूला केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आम्हा सर्वांना त्याचे कौतुक आहे. पण असे असताना घाटकोपरमध्ये सर्व गुजराती लोक राहतात म्हणून घाटकोपरची भाषा गुजराती आहे म्हणून सांगणे आणि मराठी शिकण्याची आवश्यकता नाही म्हणून सांगणे यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मग दिला त्याचे काय असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.

पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका आणि मराठी भाषेबाबत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांनी वक्तव्य केले. त्यामुळे मुबंईत येणाऱ्या लोकांनी मराठी भाषा शिकली नाही पाहिजे का, बोलणे गरजेचे नाही असा सवाल उपस्थित करत मग मुंबई आणि मराठी भाषेत वापर झाला पाहिजे असा कायदा करण्यात आला होता त्याचे काय असा सवाल करत याप्रश्नी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली.

त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य ऐकलेले नाही. पण मुंबई आणि महाराष्ट्राची राजभाषा ही मराठीच आहे. ती मराठीच आहे. पण इतर भाषांचा अपमान करणार नाही. जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो, तो इतर भाषांचाही आदर करतो. त्यामुळे मुंबईत येणाऱ्यांने मराठी भाषेतच बोललं पाहिजे आणि मराठी भाषा शिकली पाहिजे असे सांगत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे बोलण्यासाठी उभे राहत म्हणाले की, मी खरं तर मुख्यमंत्र्यांचे आभार मानायला उभा आहे. तेव्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपण पुढे गेलोय असे सांगत बोलण्याची परवानगी आदित्य ठाकरे यांना नाकारली. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानायला उभा आहे, तुम्ही आभारही मानू देणार नाही का असा मिश्किल सवाल विधानसभा अध्यक्षांना केला. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, तुमचे आभार मी रेकॉर्डवर घेतले आहे. मी स्वतः तुमचे आभार मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो असे सांगत पुढील लक्षवेधी पुकारली. मात्र दरम्यान मंत्री नारायण राणे आणि आशिष शेलार यांनी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, नितेश राणे तुम्ही खाली बसा आदित्य ठाकरे यांनी तुमचे नाही तर मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. त्यामुळे खाली बसा असे सांगत पुढील कामकाज पुकारले. मात्र पाचवी लक्षवेधी पुकारूनही लक्षवेधी कोणीच मांडेना आणि आशिष शेलार, नितेश राणे यांचा आवाज वाढायला लागल्याने अखेर विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज पाच मिनिटासाठी तहकूब केले.

About Editor

Check Also

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा सल्ला, ‘उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा’ रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा

आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर ती पदवी रोजगारात रूपांतरित होणे आवश्यक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *