विधानसभा निवडणूकीनंतर राज्यात शिवसेना उबाठाचा बालेकिल्ला असलेल्या भागातील नेत्यांना आणि पराभूत आमदारांना लक्ष करण्याचा सपाटा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने सुरु केला आहे. त्यात कोकणातील पहिला मोहरा म्हणून राजन साळवी यांना पक्षात घेतले. राजन साळवी यांच्या शिंदे यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने कोकणातील शिवसेना उबाठाला धक्का बसला असल्याचे बोलले जात असतानाच ज्या पद्धतीने राजन साळवी यांनी आपली नाराजी व्यक्त करत आणि विधानसभा निवडणूकीतील पराभवाला माजी खासदार विनायक राऊत यांना जबाबदार धरले. त्या धर्तीवर आता शिवसेना उबाठाचे सध्याचे नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनीही आता आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली. त्यामुळे राजन साळवी यांच्या पाठोपाठ भास्कर जाधवही शिवसेना उबाठा सोडणार की काय असा सवाल निर्माण झाला आहे.
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, माझ्या राजकारणाची सुरुवात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना त्यांच्यासमोरील भाषणाने झाली. त्यावेळी मला शिबिरात भाषण करायची संधी मिळायची. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना म्हणायचे की, या पोराला महाराष्ट्रात फिरवा, याला महाराष्ट्रातील ग्रामीण भागात फिरवा, तळागळातील माणूस आपल्याला जोडला जाईल, अशा पद्धतीने शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद मला लाभले, त्यानंतर शरद पवार यांचे आशीर्वाद लाभले असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, महाराष्ट्रात मला मानणारा एक वर्ग आहे. राज्यातील लोकांशी बोलतो, त्यांच्याशी संवाद साधतो, यात नाटकीपणा नसतो, लबाडी नसते. खोटं बोलेलं मला आवडत नाही. लोकांना हेच भावतं. पण मला माझं दुर्दैव सतत आडवं आलं आहे. मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नसल्याची खंत यावेळी बोलून दाखविली.
यापूर्वीही भास्कर जाधव यांनी शिवसेना उबाठात क्षमतेनुसार काम करण्याची संधी मिळत नसल्याचे सांगत आपली नाराजी व्यक्त केली होती. तसेच पक्षाच्या वाढीसाठी काही गोष्टी करायची व्यक्त केली होती.
भास्कर जाधव यांच्या या नाराजीवर संजय राऊत म्हणाले की, भास्कर जाधव यांच्याशी काल चर्चा झाली. शिवसेनेचे सर्व नेते आज आम्ही भेटणार आहोत. कोणाची खंत असेल तर त्यावर आम्ही चर्चा करू असे मत व्यक्त केले.
तर विनायक राऊत म्हणाले की, भास्कर जाधव आमचे नेते असून त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. दुर्दैवाने शिंदे गटाकडून बेसुमार पैशांचा वापर करून आमदार- खासदार फुटतील, पदाधिकारी फुटतील या अफवा पसरविल्या जात आहेत. त्या बातम्यांमध्ये कोणतेही तत्थ नसल्याचे सांगितले.
Marathi e-Batmya