विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहीम पारदर्शक व निष्पक्षपणे राबवावी महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन राज्यातील निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी राज्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले.

या शिष्टमंडळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील, शिवसेना (उबाठा) नेते तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, माजी मंत्री अनिल परब, राजेश टोपे, डॉ. विश्वजीत कदम, खासदार धैर्यशील पाटील, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन तसेच महाविकास आघाडीचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत पारदर्शकता राखावी, पात्र मतदारांची नावे अन्यायकारकरीत्या वगळली जाणार नाहीत याची खात्री करावी तसेच बनावट व दुबार नोंदींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. ग्रामीण, आदिवासी, स्थलांतरित, वंचित आणि दुर्बल घटकांतील मतदारांना कोणत्याही तांत्रिक कारणामुळे मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवले जाऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्याची मागणीही करण्यात आली.

यासोबतच मतदान केंद्रांचे नियोजन, मतदान यादीतील त्रुटी दुरुस्ती, बूथ लेव्हल अधिकाऱ्यांचे कामकाज, मतदार नोंदणी प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सर्व राजकीय पक्षांना समान संधी मिळावी याबाबतही निवडणूक आयोगासमोर विविध मुद्दे मांडण्यात आले. लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने निष्पक्ष भूमिका घ्यावी, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *