मला एका गोष्टींचे वैष्यम वाटत असून आमच्या विरोधात लढण्यासाठी चेल्या टपाट्यांचा आधार घेऊन त्यांना नेते म्हणून स्थान देत मोदी-शाह यांना आमच्याशी लढावे लागत आहे. पण मी १०६ हुतात्म्यांचे बलिदान देऊन मिळवलेली मुंबई कोणत्याही परिस्थितीत गुजरातच्या मोदी शाह यांच्या अदानीला मिळू देणार नाही असा निर्धार वजा इशारा शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपाला देत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अदानीला देण्यात आलेला धारावीचा निर्णय रद्द करणार असल्याची घोषणाही यावेळी केली.
शिवसेना उबाठा गटाचा परंपरागत दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर पार पडला या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाषण करत ठाकरे घराण्यातील चवथी पिढी अधिकृतरित्या लाँच करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजपाच्या मोदी-शाह आणि अदानीवर टीका करत सरकारी बाबूंनाही अप्रत्यक्ष सत्ताधाऱ्यांच्या पापात सहभागी होऊ नका असा इशारा दिला.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काही जणांना शिवसेनेने मोठं केलं त्यांना पद दिली, पण त्यांचाच वापर केंद्रातील भाजपाने आमच्या विरोधात करत आमचं सरकार उलथवून टाकलं. ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपाशी हिंदूत्वामुळे युती केली, त्यांना मांडीवर घेतलं आणि प्रसंगी हिंदूत्वासाठी पुढाकार घेतला. त्यावेळी हेच भाजपावाले कुठल्या कुठल्या बिळात जाऊन लपले होते. त्यावेळी फक्त शिवसेना सगळे वार अंगावर झेलत होती. आज त्याच बालासाहेब ठाकरे यांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचता असा खोचक सवालही भाजपाला केला.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, एकदा रतन टाटा मातोश्रीवर शिवसेना प्रमुखांना भेटायला आले होते. त्यावेळी त्यांनी भरपूर गप्पा मारल्या आणि भेटीनंतर जायला निघाले. निघताना मला म्हणाले की, उद्धव तुला आणि मला मोठा वारसा मिळाला आहे. हा वारसा जपण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. तुला मिळालेला वारसा हा शिवसेना प्रमुख आणि प्रबोधनकारांचा आहे. तर मला मिळालेला वारसा हा जेआरडींचा आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक निर्णय घेताना देशाचा आणि राज्यातील जनतेचा विचार आधी करावा लागणार आहे. त्यानुसार आजपर्यंत जे काही निर्णय घेत आलो ते आम्ही आमच्यासाठी नाही तर या मराठी जनतेसाठी आणि शिवसैनिकांसाठी घेत आलो आहोत असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला मध्यंतरी काहीजण म्हणत होते की, तुम्ही भाजपाबरोबर का गेला नाहीत, त्यावेळी मी त्यांना म्हणाले की, का जाऊ आणि कसा जाऊ कारण जिथे मान-सन्मान ठेवून आणि मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान ठेवून जायची वेळ येईल तिथे मी कधीही जाणार नाही. मी तर म्हणेन की जो महाराष्ट्राला लुटायला येतो तो माझ्यासाठी महाराष्ट्र द्रोही आहे. अशा महाराष्ट्र द्रोह्यांसोबत मी कसा जाईन असे सांगत राज्यातील मिंधेचे सरकार हे महाराष्ट्र द्रोह्यांचे सरकार आहे. त्यांच्याकडून महाराष्ट्राला लुटण्याचे काम होत असल्याची टीकाही यावेळी केली.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, राज्यात भाजपाल्यांना सत्तेत यायचं होते म्हणून त्यांनी धनगर समाजाला आरक्षण देतो, मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणत सगळ्यांना उठवून बसवलं. या भाजपावाल्यांचे हेच काम आहे की, आधी हिंदू-मुस्लिम म्हणून दोघांना लढवायचं आणि त्यानंतर मात्र हिंदू हिंदूमध्ये भेदभाव करत त्यांना लढायला लावलायचं, हे सगळं कशासाठी तर फक्त त्यांना सत्ता भोगायची आहे म्हणून ते सगळ्यांमध्ये भांडणं लावत असल्याचा आरोपही भाजपावर केला. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राला लुटण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांवर गुन्हे दाखल करणार असून त्यांना तुरुंगात पाठविल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार व्यक्त करत माझं सरकारी अधिकाऱ्यांना आवाहन आहे की महाराष्ट्राला लुटणाऱ्यांच्या पापात सहभागी होऊ नका नाही तर तुम्हालाही तुरुंगात जावं लागेल असा इशाराही यावेळी दिला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज मंदिर उभारायचं काम भाजपा वाल्यांकडून सुरु आहे. बरं आपण जय श्रीराम आपण कशाला म्हणतो, आपल्या आपल्यात भांडण करण्यासाठी म्हणायचं असा सवाल करत यांनी मालवण मधील शिवरायांच्या पुतळा उभारणीतही पैसे खाल्ले त्यामुळे तो पुतळा वर्षभरात कोसळला. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला असे सांगत शिवाजी महाराजांचे मंदीर प्रत्येक ठिकाणी उभारणार असल्याची घोषणाही यावेळी केली.
या मुंबईतील मराठी बाणा टिकून मराठीपण टिकून रहावे आणि या संकल्पनेतून ज्या शिवसेनेचा जन्म झाला. ती शिवसेना काहीही झाले तर १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळवलेली मुंबई गुजरातच्या अदानी-मोदी शाह यांची कधीच होऊ देणार नाही अशी ग्वाहीही उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात उपस्थित शिवसैनिकांना दिली.
दसरा मेळावा #२०२४ | प्रमुख मार्गदर्शक – पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे | शिवतीर्थ, दादर, मुंबई – #LIVE https://t.co/mCt68YiuaW
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 12, 2024
Marathi e-Batmya