नागपूरातील हिवाळी अधिवेशनास कालपासून सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे कालपासून अधिवेशनात सहभागी झाले. आज अधिवेशनाचा दुसऱ्या दिवशीही उद्धव ठाकरे हे विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी झाले. मात्र आज उद्धव ठाकरे यांचा नूर काही केल्या औरच असल्याचे विधिमंडळाच्या परिसरात पाह्यला मिळाले. आज एकाच दिवशी राष्ट्रवादीतील छगन भुजबळ यांच्या निमित्ताने नाराजी नाट्य, मंत्री पदावरून भाजपामध्येही धुसफुस आदी पाह्यला मिळत आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या विरोधात षढयंत्र रचल्याच्या माजी डिजीपी संजय पांडे यांच्याभूमिकेवरून विधान परिषदेच चर्चेला तोंडही फुटले, त्यावर अद्याप सरकारकडून अंतिम निर्णय देण्यात आलेला नसला तरी त्यावरील चर्चेने सभागृहात सरकारची बाजू लंगडी असल्याचे चर्चेच्या आविर्भावावरून जाणवत होते.
यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी नागपूरात माझी लाडकी बहिण योजनेवरून पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला टोले लगावत निवडणूक काळात २१०० रूपये देण्याचे आश्वासनाची अंमलबजावणी करण्याचे आव्हानही राज्य सरकारला दिले.
त्यानंतर विधिमंडळाच्या परिसरात परतलेले उद्धव ठाकरे यांनी यावेळी विधान परिषदेतील चर्चेची माहिती भाजपाचे गटनेते प्रविण दरेकर हे प्रसार माध्यमांना देत होते. त्यावेळी तेथून उद्धव ठाकरे हे चालले होते. त्यावेळी त्यांनी प्रविण दरेकर यांना मोठ्याने आवाज देत थेट अरे प्रविण मी बोलू का अशी मिश्किल विचारणा केली. पहिल्यांदा न ऐकलेले प्रविण दरेकर पुन्हा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. त्यावेळी एकाने उद्धव ठाकरे हे बोलू का म्हणून विचारत असल्याचे प्रविण दरेकर यांना सांगितले.
त्यावर प्रविण दरेकर हे उद्धव ठाकरे यांच्याकडे पहात म्हणाले की, नको साहेब, तुमच्या पाया पडतो असे सांगत मिश्किल उत्तर देत आपली राजकिय असमर्थता दर्शविली. त्यावर उद्धव ठाकरे हे पुढे निघून गेले.
त्यानंतर अचानक पणे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत १५ ते २० मिनिटे चर्चा केल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाजूने निर्णय देणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीसाठी गेल्याचे दिसून आले. त्यानंतर यासंदर्भातील माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीच देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काय चर्चा झाली हे आपल्याला माहिती नाही. मात्र राज्यातील दोन मोठे नेते आज भेटले असे सांगत विरोधी पक्षनेते पदा संदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगत त्यावर अधिक काही बोलण्यास नकार दिला.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना छगन भुजबळ यांच्याबद्दलही मत व्यक्त करताना म्हणाले की, या सरकारची झालीय दैना झालीय. या प्रकरणी छगन भुजबळ काही माझ्या संपर्कात नाहीत. मात्र छगन भुजबळ हे नेहमी संपर्कात असतात असे सांगत छगन भुजबळ हे शिवसेनेत येणार असल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले.
Marathi e-Batmya