राज्यातील विरोधकांकडून एकाबाजूला भाजपाला हरविण्यासाठी विविध पातळीवर मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु असतानाच महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्यात परस्पर विरोधी भूमिका असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सध्या संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. अदानीप्रकरणी जेपीसी काँग्रेसची भूमिका असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेली समिती योग्य असल्याचे भाष्य केले. तर आजपर्यंत आगामी निवडणूका महाविकास आघाडी म्हणून लढविण्याची इच्छा व्यक्त करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी मविआ म्हणून निवडणूकीला सामोरे जाण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगत २०२४ च्या निवडूका एकत्र लढविणार की स्वतंत्र लढणार याबाबत वक्तव्य केल्याने महाविकास आघाडीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
अमरावतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी महाविकास आघाडीतील जागावाटप आणि वंचित बहुजन आघाडीच्या मविआतील समावेशावर भाष्य करताना म्हणाले, वंचित बहुजन आघाडी अर्थात प्रकाश आंबेडकरांशी आमची महाराष्ट्रातील आघाडीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. फक्त कर्नाटक निवडणुकीत काही जागांबाबत त्यांच्याशी चर्चा झाली आहे, असं स्पष्ट केले.
दरम्यान, पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये मविआ एकत्र लढणार नसल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. त्यात सत्ताधाऱ्यांकडूनही वारंवार या मुद्द्यावरून टीका-टिप्पणी केली जात आहे. त्यासंदर्भात माध्यमांनी विचरणा केली असता शरद पवारांनी सूचक विधान करताना म्हणाले, आम्ही एकत्र लढणार वैगरेबद्दल बोलायचं झालं, तर आज आमची आघाडी आहे. एकत्र काम करण्याची इच्छा आहे. पण फक्त इच्छाच नेहमी पुरेशी नसते. जागांचं वाटप, त्यात काही अडचणी आहेत की नाहीत यावर अजून चर्चा केलीच नाही. त्यामुळे यावर कसं सांगता येईल? असं सांगत आगामी निवडणूका महाविकास आघा़डी म्हणून सामोरे जाणार की नाही याबाबत वक्तव्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
भाजपाकडून अजित पवारांना फोडण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चांवरही शरद पवारांनी भाष्य करताना कुणी फोडायचं काम करत असेल, त्यांचा तसा काही कार्यक्रम असेल तर ते करत राहतील. आम्हाला जेव्हा यासंदर्भात ठाम भूमिका घ्यायची असेल, तेव्हा ती घ्यावी लागेल. त्यावर आज काही सांगता येणार नाही. कारण याबाबत आम्ही काही चर्चाच केलेली नाही, असेही स्पष्ट केले.
Marathi e-Batmya