देशभरात विविध मुद्द्यांवरून चर्चा होत असताना, डहाणू येथे गुरुवारी झालेल्या सभेत भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय निमंत्रक योगेंद्र यादव यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील भाजपा-शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यादव यांनी सरकारवर “झूट, लूट, फूट सरकार” असल्याचा आरोप करत सत्ताधारी नेत्यांच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उभे केले.
यावेळी योगेंद्र यादव म्हणाले, “पंतप्रधान खोटे बोलतात, त्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटे बोलतात, तर यात नवल ते काय ? जनतेच्या विश्वासासोबत खेळ करणाऱ्या या नेत्यांना यंदाच्या निवडणुकीत त्यांची योग्य जागा दाखवून द्या.” त्यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की, “लोकशाहीत विचारांची ताकद आहे, पैशांची नव्हे.” यादव यांनी इतिहासातील उदाहरणांचा उल्लेख करून मतदारांना विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन केले.
“देश फोडणाऱ्या गद्दारांना रोखण्यासाठी आम्ही राजकारणात उतरणार” – उल्का महाजन
“देशात गद्दारांनी देशाचे तुकडे करण्याचा डाव आखला आहे. अशा लोकांपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी, कोणत्याही राजकीय पक्षाशी न जोडता, आम्ही या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे,” असे राज्य समन्वयक उल्का महाजन यांनी ठामपणे जाहीर केले. यावेळी महाजन म्हणाल्या की, आदिवासी हक्कांसाठी काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी तयार केलेल्या अत्याचार प्रतिबंधक कायदा व पेसा कायद्याचे महत्व अधोरेखित केले. मात्र, विविध प्रकल्पांच्या माध्यमातून या कायद्यांची पायमल्ली होत असल्याची तीव्र टीका त्यांनी केली. “छत्तीसगड आणि मणिपूरमध्ये आदिवासींवर अन्याय चालू असताना, आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्याने काय फरक पडतो ?” असा सवाल त्यांनी विचारला. तसेच, आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत व प्रकल्पांच्या नावाखाली आदिवासी जमिनींचे हस्तांतरण थांबवावे, अशी मागणी त्यांनी प्रखरपणे मांडली.
डहाणू हे आंदोलनांचे केंद्र, रिमोट कंट्रोलद्वारे भूमिपूजन म्हणजे आंदोलनकर्त्यांचे यश – संजय गोपाळ
“डहाणू हे पॉवर सेंटर असल्यामुळेच येथे आंदोलने होत आहेत. पंतप्रधानांनी वाढवणमध्ये प्रत्यक्ष न येता रिमोट कंट्रोलद्वारे बंदराच्या भूमिपूजनाचे उद्घाटन करणे हे आंदोलनकर्त्यांसाठी मोठे यश आहे,” असे प्रतिपादन राज्य समन्वयक संजय गोपाळ यांनी केले आहे. भारत जोडो अभियान हा लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीचा उपक्रम असून, महायुती सरकारचे चुकीचे निर्णय व कारनामे जनतेसमोर मांडणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे गोपाळ यांनी सांगितले. विविध मतदारसंघांमध्ये या उद्देशासाठी काम सुरु असल्याचेही त्यांनी नमूद केले.
विचारांच्या ताकदीने लढाई जिंकता येते – आमदार विनोद निकोले
सभा अधिक रंगतदार करत, आमदार विनोद निकोले यांनीही भाजपा आणि त्यांच्या सहयोगी पक्षांवर जोरदार टीका केली. “भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांनी विकासाच्या नावाखाली सामान्य जनतेची फसवणूक केली आहे. इथल्या आदिवासींच्या हक्कांसाठी संघर्ष करणे हे आपले कर्तव्य आहे आणि याची आम्ही वचनबद्धता ठेवतो,” असे निकोले यांनी ठासून सांगितले. त्यांनी भाजपाच्या विकासाच्या घोषणांवर टीका करत म्हणाले की, “पैशाच्या जोरावर नव्हे तर विचारांच्या ताकदीने लढाई जिंकता येते, हे इतिहासाने अनेकदा सिद्ध केले आहे.”
यावेळी महाविकास आघाडीतील नेते, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत उपस्थित कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणा देऊन आपला निषेध नोंदवला. कार्यकर्त्यांनी दिलेल्या जोरदार समर्थनामुळे सभा अधिक प्रभावी ठरली. या सभेत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या आदिवासी धोरणांवरही टीका केली. “सत्ताधारी सरकार केवळ मतांसाठी आदिवासींच्या हक्कांचे शोषण करीत आहे,” असे वक्तव्य काही नेत्यांनी केले. आदिवासी हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनीही आदिवासींच्या समस्या सोडवण्याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. संपूर्ण सभेत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकजूट दर्शवली आणि आगामी निवडणुकीत भाजपा सरकारला हरवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे घोषित करण्यात आली.
दरम्यान भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय निमंत्रक योगेंद्र यादव, राज्य समन्वयक उल्का महाजन, संजय गोपाळ, कष्टीकरी संघटनेचे ब्रायन लोबो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पालघर जिल्हा सचिव कॉम्रेड किरण गहला, आमदार विनोद निकोले यांच्या सह महाविकास आघाडी चे पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते व कॉम्रेड्स उपस्थित होते.
Marathi e-Batmya