भीम आर्मीच्या संविधान जनजागृती यात्रेत एक वही एक पेनचा जागर

भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेने संविधान दिन ते महापरीनिर्वाण दिन अशा १२ दिवसीय संविधान जनजागृती यात्रेचे आयोजन केले असून हार फुलांऐवजी वह्या पेन पुस्तक संगणक मोबाईल आदी शैक्षणिक साहित्य देवून या यात्रेचे स्वागत करावे असे आवाहन या संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

भीम आर्मीने २६ नोव्हेंबर या संविधान दिनापासून ६ डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन अशा राज्यस्तरीय पुणे ते मुंबई संविधान जनजागृती यात्रेचे आयोजन केले आहे .भारतीय संविधान तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक विचारांचा जागर या जनजागृती यात्रेत करण्यात येणार असून या यात्रेच्या स्वागतासाठी हार, फुले, फटाके तसेच इतर अनावश्यक खर्च टाळून केवळ वह्या, पेन पेन्सिल, पुस्तके, वापरात नसलेले संगणक, मोबाईल व इतर शैक्षणिक साहित्य देवून जनजागृती यात्रेचे स्वागत करावे असे आवाहन भीम आर्मीच्या वतीने करण्यात आले आहे.

ज्येष्ठ पत्रकार राजू झनके यांच्या संकल्पनेतून साकार झालेले  ‘एक वही, एक पेन अभियान भीम आर्मीच्यावतीने संविधान यात्रेत राबविण्यात येणार असून राज्यभरातून जमा झालेले हे शैक्षणिक साहित्य दादर चैत्यभूमी येथे नेवून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना शैक्षणिक साहित्यांनी अभिवादन करण्यात येईल. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करून मदतीचा हात देण्यासाठी हे अभियान राबविणार असल्याची माहीती या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सीताराम गंगावणे यांनी दिली.

पुण्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून सुरू होणारी संविधान यात्रा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जाणार असून ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी दादर येथे भीम आर्मी संस्थापक अॅड चंद्रशेखर आजाद व राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन सभा घेऊन या यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे.

About Editor

Check Also

डॉ बाबासाहेब आंबेडकरः आंबेडकरवादी विचारांचे सामाजिक प्रतिबिंब आणि सद्यस्थिती ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांच्या बारामती येथील राज्यस्तरीय राजकिय परिषदेतील भाषणाचा संपादित भाग

सर्वप्रथम आंबेडरवादी विचार काय आहेत हे समजून घेतले पाहिजे. अर्थात मर्यादित वेळेत जे मी मांडणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *