देशातील कोट्यावधी मुक्या लोकांना कंठ देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३४ वी जयंती, या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या आयुष्यातील दोन मोठ्या घटनांवर अधून मधून कधी तरी चर्चा होते. पण त्याची दखल म्हणावी तशी यापूर्वीचे राजकारणी आणि आताही राज्यातील सत्ताधानी असलेले काय किंवा विरोधात असलेले काय किंवा स्वतःला दलित नेते म्हणून घेणाऱे काय यातील कोणालाच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा तो आदर्श किंवा जीवनातील महत्वाचा टप्पा ठरलेल्या गोष्टीचे अनुकरण करावे असे वाटत नाही.
त्याचबरोबर स्वातंत्र्यपूर्व काळात काही ब्रिटीश पत्रकार भारतातील नेते रात्रीचे नेते काय करतात याचा कानोसा घेण्यासाठी मध्यरात्रीनंतर भारतीय नेत्यांच्या घरी जाऊन माहिती घेत होते, त्यावेळी त्या पत्रकारांनी सर्वात आधी त्यावेळच्या दोन मोठ्या नेत्यांच्या घरी गेले. मात्र ते दोन्ही नेते झोपले असल्याचे त्यांच्या घरच्यां लोकांनी सांगितले. त्यानंतर या पत्रकार महोदयांनी मुंबईत बीआयटी चाळीत राहणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी गेले. तर डॉ बाबासाहेब आंबेडकर हे रात्रीचे अभ्यास करत असल्याचे दिसून आले. त्यावेळी त्या पत्रकारांनी थोडीशी भेटीची वेळ मागितली आणि काही वेळासाठी डॉ आंबेडकर यांना भेटले. त्यावेळी मध्यरात्र टळून गेली होती. मध्यरात्री भेटणाऱ्या पत्रकाराने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना प्रश्न केला की, तुम्ही अजूनही जागे आहात डॉ आंबेडकर, आम्ही तुमच्या काही नेत्यांच्या घरी गेलो होतो, तर इतर नेते झोपल्याचे त्यांच्या घरच्या व्यक्तींनी सांगितले. पण तुम्ही अद्याप जागे कसे ? त्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर देत म्हणाले, ते त्यांच योग्य आहे, कारण त्यांचा समाज जागा आहे म्हणून त्यांचे नेते झोपलेले आहेत. पण माझा समाज २५०० वर्षापासून झोपलेला आहे, त्याला जागे करण्यासाठी मी अद्याप जागा आहे असे उत्तर ऐकताच तो ब्रिटीश पत्रकार आवाकच् झाला.
मुंबई-महाराष्ट्रासह संबध भारतभरातील लोकांना माहित होते की, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे दादर जवळच्या बीआयटी चाळीत रहात होते. तसेच ते आर्थिक परिस्थिती सुद्धा त्यांची नाजूक आहे म्हणून. पण तरीही सरकारी त्यावेळच्या ब्रिटीश सरकारकडून जी काही कागदपत्रे-पत्र व्यवहार केला जात असे किंवा एखाद्या कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायचे असेल तर तेथे बीआयटी चाळीतच जाणून त्यांना देत असत. इतकेच नव्हे तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भेटण्यासाठी छत्रपती शाहु महाराज हे स्वतः बीआयटी चाळीत गेले होते.
ज्ञानाच्या बळावर अशा मोठमोठ्या व्यक्ती घरी येत असूनही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कधी त्याचा गर्व किंवा अभिमान झाला नाही. त्यामुळे ते शेवटपर्यंत विनम्रच राहिले. शिक्षणाच्या निमित्ताने त्यांचे अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात आणि इंग्लडच्या स्कूल ऑफ इकॉऩॉमिक्समध्ये जाणे होत असे, पण येताना अमेरिका आणि इंग्लडवरून ते पुस्तकांच्या बॅगा मात्र भरून आणायचे. आणि मुंबईत परतल्यानंतर त्याचे अभ्यास करायचे. एकदा अमेरिकेहून परत येताना मुंबईत येणाऱ्या आधीच्या जहाजाने त्यांनी पुस्तकांची बॅग पाठविली होती. दुसऱ्या जहाजाने ते मुंबईत आले. पण त्याच्या आधी निघालेल्या जहाजाला अपघात झाला आणि त्यात त्यांनी पुढे पाठविलीली पुस्तकांची बॅग समुद्रात बुडाली. ज्या वेळी ही घटना डॉ आंबेडकर यांना मुंबईत आल्यानंतर कळाली तेव्हा त्यांना फारच दुःख झाले.
मुंबईतील बीआयटीच्या चाळीतील खोल्या या आकाराने खुपचं लहान आहेत, त्या खोल्या आजही आणि आताही काहीशा बदलेल्या स्वरूपात आपणाला आजही पाह्यला मिळतील. त्या खोल्यामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा कुटुंबकबिला आणि त्यांच्या भावांचा परिवार रहात होता. पण तशा अडचणीतही त्यांना घर बदलण्याचा विचार कधी केला नाही. पण कालांतरांने त्यांच्या वैयक्तिक पुस्तकांचा संग्रह वाढत चालला आणि घरातील, आताच्या मडके बुवा चौकातील कार्यालयातील जागाही पुस्तकांसाठी अपुरी पडू लागली. त्यावेळी त्यांनी पुस्तकांसाठी नवे घर घेण्याचे ठरवले. वेळ चांगली होती म्हणून म्हणा, दादरच्या हिंदू कॉलनीत त्यांना जागा मिळाली. तेव्हाच्या तुलनेत ती महागच होती. पण ती जागा घेतली. त्या जागेवर घर बांधायचे ठरविले तेव्हा पुस्तकासाठी प्रशस्त जागा मिळावी म्हणून त्या दृष्टीने घरांची बांधणी करण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्घतीने ते घरही बांधले. हे घर दादर मधील हिंदू कॉलनीतील राजगृह म्हणून भव्य वास्तू बांधली. ती वास्तू आजही तितक्याच दिमाखात उभी आहे.
त्यावेळी आणि त्यानंतरही आज २१ वे शतक सुरु होवून त्याचा एकतृतियांश भागही संपले, पण पुस्तकासाठी घर बांधणारा एकही नेता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर अद्याप दुसरा झाला नाही. तसेच त्यांच्या प्रत्येक भाषणात भाषेतील शालीनता, आणि अचूक शब्दांची निवड आणि योग्य भावार्थ आणि त्यातून ते जे त्यांना सांगायचेय तोच भाव समोरच्या श्रोत्यापर्यंत पोहोचला पाहिजे याची हातोटी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर इतर कोणत्याही नेत्याच्या भाषणात शोधूनही सापडत नाही.
आताच्या विद्यमान परिस्थितीत अनेक राजकीय पक्षांचे नेते डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतल्याशिवाय भाषणाची सुरुवात आणि शेवटही करत नाहीत. पण या नेत्यांच्या भाषणात आक्रस्ताळेपणा, द्वेष आणि धमक्यांचा सूर जरा जास्तच जाणवून येतो. तर काहींची डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने स्वतःच्या विनोदाचे कार्यक्रम आणि राजकिय नेतृत्वाची हौस भागवून घेण्याचा प्रकार सध्या काही जणांकडून सर्रास करताना आढळून येत आहे. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनीच त्यावेळी कार्यकर्त्यांना केलेल्या आवाहनानुसार हा समतेचा रथ पुढे नेता नाही आला तर नका नेऊ पुढे पण मागे तरी नेऊ नका असे म्हणण्याची पाळी आज त्यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा म्हणण्याची पाळी आली आहे.
गिरिराज सावंत-
gsawant2001@yahoo.co.in
Marathi e-Batmya