परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना संधी देणारे डॉ. राम ताकवले याचं निधन नाशिकच्या मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरु, एमकेसीएलचे संस्थापक, पुणे विद्यापाठीचे कुलगुरु

ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व राष्ट्रसेवा दल व समाजवादी विचारसरणीचे विचारवंत प्रो. राम ताकवले यांचे आज निधन झाले. मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, सोबतच पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले होते. महाराष्ट्र ज्ञानमंडळाची स्थापना (एमकेसीएल) झाली त्यामध्ये संस्थापक संचालक म्हणूनही त्यांनी भूमिका बजावली होती.

त्यांनी शिक्षकांसाठी बॅचलर ऑफ एज्युकेशन, मुक्त शिक्षण स्त्रोत निर्मिती आदी विविध प्रकारचे साहित्य लेखन केले होते. दूर व मुक्त शिक्षणात त्यांचे भरीव काम होते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कॉमन वेल्थ ऑफ लर्निंग हा पुरस्कार त्यांना मिळाला होता. तसेच राष्ट्रीय स्तरावर देखील अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.

मुक्त विद्यापीठानंतर १९९६ ते १९९८ या काळात त्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू पदाची जबाबदारी ही सांभाळली होती. त्या ठिकाणी त्यांनी प्राध्यापकांना स्वातंत्र्य देऊन समाजाभिमुख शिक्षणक्रम साठी भरीव योगदान दिले होते.

शिक्षण क्षेत्राची मोठी हानी-विरोधी पक्षनेते अजित पवार यांची श्रद्धांजली

“ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, तत्कालीन पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले सरांच्या निधनानं उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात मौलिक कार्य करणारं, राज्याच्या, देशाच्या शिक्षणक्षेत्राला दिशा देणारं महान व्यक्तिमत्वं हरपलं आहे. उच्च शिक्षणाचा प्रसार आणि दर्जा उंचावण्यात त्यांनी मोलाचं योगदान दिलं. परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहिलेल्या युवकांना, ज्येष्ठांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी, राज्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावली.

शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्याशी जवळचं नातं असलेल्या डॉ. ताकवले सरांनी तत्कालीन पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु, ‘नॅक’ या राष्ट्रीय संस्थेचे अध्यक्ष म्हणून शैक्षणिक क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवण्याचं काम केलं. त्यांनी घडवलेले विद्यार्थी आज देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देत आहे. डॉ. ताकवले सरांचं निधन ही राज्याच्या, देशाच्या शिक्षण क्षेत्राची मोठी हानी आहे. मी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी डॉ. राम ताकवले यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

About Editor

Check Also

शुभमन गिल

भारत-दक्षिण आफ्रिका गुवाहाटी कसोटीतून शुभमन गिल बाहेर, ऋषभ पंत कर्णधार

भारताचा कर्णधार शुभमन गिल गुवाहाटी येथे होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. यष्टीरक्षक-फलंदाज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *