मुंबई : प्रतिनिधी
रेल्वे, बस स्थानके, इमारती-जीन्यातील कोपरे या ठिकाणी पान खावून त्याच्या पिचकाऱ्या मारत विश्वविक्रमी डाग निर्माण करणाऱ्या महाभागांची संख्या देशात कमी नाही. मात्र या लाल रंगाचे डाग स्वच्छ करण्यासाठी पर्याय शोधला जात होता. अखेर पानाचे लाल डाग नष्ट करण्यासाठी अखेर अंतिम तोडगा मिळाला असून मुंबईतील रूईया कॉलेजच्या विद्यार्थींनीना हा तोडगा मिळाला आहे. या विद्यार्थींनीनी केलेल्या संशोधनाला अमेरिकेच्या मॅसॅच्युसेटस् इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) चे सुवर्ण पदकही मिळाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेत विद्यार्थींनीचे कौतुक केले.
एमआयटी विद्यापीठातर्फे दरवर्षी ‘International Genetically Engineered Machines (IGEM)’ ही जागतिक संशोधन स्पर्धा आयोजित केली जाते. जगातील उच्च दर्जाचे काही मोजके संशोधन प्रकल्प या स्पर्धेसाठी निवडले जातात. त्यानुसार या स्पर्धेत जगभरातून तीनशेहून अधिक संघ सहभागी झाले होते.
रुईयाच्या प्रकल्पाला बेस्ट इंटिग्रेटेड ह्युमन प्रॅक्टिसेससाठीचे विशेष पारितोषिकही देण्यात आले. या संघाचे बेस्ट प्रोजेक्ट अंडर एन्व्हायरनमेंट ट्रॅक आणि बेस्ट प्रेझेंटेशन या अन्य दोन विशेष पारितोषिकांसाठीही नामांकन झाले आहे.
रूईयाच्या या महत्त्वपुर्ण संशोधन प्रकल्पात सहभागींमध्ये अंतिम वर्षात शिकणाऱ्या ऐश्वर्या राजूरकर, अंजली वैद्य, कोमल परब, निष्ठा पांगे, मैथिली सावंत, मिताली पाटील, सानिका आंबरे आणि श्रृतिका सावंत यांचा समावेश आहे. रुईयाच्या या आठ विद्यार्थिनींच्या चमुला डॅा. अनुश्री लोकुर, डॅा. मयुरी रेगे, सचिन राजगोपालन आणि मुग्धा कुळकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
पान खाऊन थुंकल्यामुळे आढळणाऱ्या पानाचे डाग स्वच्छ करण्याची समस्या मोठी आहे. हे डाग काढण्याचा सोपा आणि पर्यावरणपूरक मार्ग या प्रकल्पात समाविष्ट आहे. पान खाऊन कुठेही थुंकण्यामुळे केवळ आरोग्याला धोका उत्पन्न होत नाही. तर त्यामुळे ऐतिहासिक स्थळे, स्मारके व सार्वजनिक वास्तूंचे सौंदर्यही नष्ट होते. मुंबई शहरात उपनगरीय रेल्वेसाठी त्यांच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या इमारती, तसेच रेल्वे डब्यांमधील हे डाग नष्ट करण्यासाठी दरमहा कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. शिवाय यात मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. तरीही डाग पूर्णपणे काढले जात नाहीत.
या समस्येवर जैविक संश्लेषणच्या आधारे पर्यावरणपूरक उपाय शोधण्याची संकल्पना डॉ. रेगे यांनी मांडली. पानाचे डाग प्रभावीपणे दूर करण्यासाठी पर्यावरणपूरक उपाय शोधण्यात येत आहे. शिवाय हा उपाय स्वस्त असावा, असाही प्रयत्न यात करण्यात आला आहे. त्यानुसार पानाच्या डागाचा लाल रंग सुरक्षित रंगहीन उत्पादनात परिवर्तित करणाऱ्या सूक्ष्मजीवांचा (मायक्रोब्स) आणि विकर (एन्झायम्सचा) या घटकांचा वापर या प्रकल्पात अंतर्भूत केला आहे. पान विक्रेते, स्थानकांचे व्यवस्थापक, शासकीय अधिकारी, सफाई कामगार आणि सफाईचे काम करणाऱ्या संस्था यांच्याशी संवाद साधून त्यांच्या सूचनांचाही या घटकांच्या निर्मितीत अवलंब केला आहे.
भारतातील संशोधनास आंतरराष्ट्रीय व्यासपीठ लाभावे यासाठी भारत सरकारचा जैवतंत्रज्ञान विभाग (DBT) प्रयत्नशील असतो. विविध संशोधन संस्थांकडून यासाठी प्रस्ताव मागविण्यात येऊन त्यातील उच्च दर्जाच्या काही प्रस्तावांची हा विभाग निवड करतो व त्यांना अनुदान देतो. त्यातून या स्पर्धेसाठी राष्ट्रीयस्तरावर पाच प्रकल्पांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये केवळ रुईया महाविद्यालयाचा समावेश होता. अन्य आयआयटी, तत्सम संस्था होत्या. या संशोधन प्रकल्पासाठी महाविद्यालयाला दहा लाखांचे अनुदान देण्यात आले होते.
उद्योगजगत आणि रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाच्या सूक्ष्म जीवशास्त्र विभागातील माजी विद्यार्थ्यांचे सहकार्यही या संघाला लाभले आहे. स्वच्छ भारत अभियानातून प्रेरणा घेतलेल्या या प्रकल्पामुळे या राष्ट्रीय अभियानाला आंतर राष्ट्रीयस्तरावर प्रतिष्ठा मिळाली असून त्यातून या स्वच्छता अभियानाप्रती आपली समर्पित भावना आणखी वृध्दिंगत झाली आहे. हा संशोधन प्रकल्प यशस्वी होण्यात उद्योग जगत, शासनाचे विविध विभाग तसेच स्वयंसेवी संस्थांनीही सहकार्य केले आहे.
Marathi e-Batmya