टीव्हीके प्रमुख विजय थलपती यांना ११८ आमदारांचा समर्थन दाखविण्याची राज्यपालांची सूचना तर डावे, एआयडीएमके आणि द्रमुक आघाडीचे सरकार स्थापनेचा दावा

सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय थलपती यांनी गुरुवारी तामिळनाडू लोक भवनात राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची पुन्हा भेट घेतल्यानंतर तामिळनाडूमध्ये तीव्र राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ११२ आमदारांचा पाठिंबा दर्शवल्यानंतर, विजय यांना २३४-सदस्यीय विधानसभेतील ११८ आमदारांच्या पाठिंब्याचा पुरावा सादर करण्यास सांगण्यात आले. काँग्रेसने आधीच टीव्हीकेला पाठिंबा दिल्यानंतर, आता पक्षाने दोन आमदार असलेल्या व्हीसीकेशी संपर्क साधला आहे, तसेच डाव्या पक्षांकडूनही पाठिंबा मागितला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने टीव्हीकेला विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करण्याची संधी देण्यास पाठिंबा दर्शवला आहे, तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) ने शुक्रवारी होणाऱ्या राज्य समितीच्या बैठकीनंतर आपली भूमिका ठरवणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, वेगाने बदलणाऱ्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली डीएमकेने आपल्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली आहे.

एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील पक्षाशी संबंध तोडून टीव्हीकेसोबत हातमिळवणी केल्याबद्दल डीएमकेने काँग्रेसचा निषेध करणारा ठराव मंजूर केला आहे.

“विजयानंतर आमच्या पक्षाध्यक्षांना काँग्रेस नेतृत्वाकडून सदिच्छा भेट किंवा आभाराचे शब्दही मिळाले नाहीत. उलट, काँग्रेस पक्षाने आमचा विश्वासघात केला आणि आमच्या पाठीत खंजीर खुपसला,” असे या ठरावात म्हटले आहे.

“भाजपा अनेक राज्यांमध्ये जे करतो, तेच काँग्रेसने आता तामिळनाडूमध्ये आमच्यासोबत केले आहे. आपल्या मित्रपक्षांचा विश्वासघात करून आणि मित्र राजकीय शक्तींना कमजोर करून काँग्रेसने घेतलेल्या या अचानक भूमिकेचा ही सभा तीव्र निषेध करते,” असेही त्यात म्हटले आहे.

तामिळनाडू सरकार स्थापनेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, एआयएडीएमकेचे आमदार अनबझगन यांनी टीव्हीकेकडून बहुमताचा पुरावा मागण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाचे समर्थन केले. पक्षाला पाठिंबा दर्शविण्यास सांगण्यात “काहीही चुकीचे नाही” असे ते म्हणाले.

“सभागृहात बहुमत दाखवणे ही वेगळी गोष्ट आहे. आपल्या घटनात्मक अधिकाराचा भाग म्हणून त्यांनी टीव्हीकेला विचारले आहे,” असे ते म्हणाले.

एआयएडीएमके आमदारांना पुदुचेरी येथे हलवण्यामागे गुप्तता असल्याचा आरोप अनबझगन यांनी फेटाळून लावला आणि हे पाऊल एडप्पाडी के पलानीस्वामी यांच्या माहितीनेच उचलण्यात आले असल्याचे सांगितले. “आम्हाला आमदारांना एकत्र ठेवायचे होते, म्हणूनच आम्ही त्यांना येथे आणले,” असे ते म्हणाले.

तामिळनाडूतील राजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेते आणि पक्षाचे राज्य प्रभारी, गिरीश चोडणकर यांनी राज्यपालांवर जोरदार हल्ला चढवला. जनतेच्या कौलाचा आदर करण्याऐवजी राज्यपाल भाजप आणि आरएसएसच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

चेन्नईत बोलताना चोडणकर यांनी आरोप केला की, राज्यपाल “संविधान आणि तामिळनाडूच्या जनतेपुढे झुकण्याऐवजी भाजपापुढे झुकत आहेत.”

“त्यांच्या आरएसएस पार्श्वभूमीमुळे आणि नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या दबावामुळे, मला वाटते की राज्यपाल संविधान आणि तामिळनाडूच्या जनतेपुढे झुकण्याऐवजी भाजपपुढे झुकत आहेत. हे योग्य नाही,” असे ते म्हणाले.

“संविधान अगदी स्पष्ट आहे. राज्यपालांनी तामिळनाडूच्या जनतेने दिलेल्या जनादेशाचा आदर केलाच पाहिजे. बहुमत सिद्ध करण्यासाठी संविधानाने विधानसभेचे सभागृह हेच निश्चित केलेले ठिकाण आहे. मग राज्यपालांसमोर बहुमत का सिद्ध करावे लागावे?” असा प्रश्न चोडणकर यांनी विचारला.

टीव्हीके नेते सीटीआर निर्मल कुमार यांनी गुरुवारी सीपीआयचे राज्य सचिव एम. वीरपांडियन यांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाचा पाठिंबा मागितला, कारण विजय यांच्या नेतृत्वाखालील पक्षाकडे स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी साधे बहुमत नाही.

टीव्हीकेच्या संयुक्त महासचिवांनी चेन्नईतील सीपीआय कार्यालयाला भेट दिली आणि कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा मागितला.

टीव्हीकेने यापूर्वीच डावे पक्ष, व्हीसीके आणि आययूएमएल यांच्याकडे पाठिंब्याची विनंती केली आहे, असे ते म्हणाले आणि टीव्हीके सरकार स्थापन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

About Editor

Check Also

निवडणूक आयोगाकडून फाल्टा मतदारसंघात फेरमतदान निवडणूक गैरप्रकार आणि लोकशाही प्रक्रियेचा भंग झाल्याने पुर्नमतदान

भारतीय निवडणूक आयोगाने शनिवारी पश्चिम बंगालच्या फाल्टा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याचे आदेश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *