प्रियांका गांधी यांचा भाजपाला सवाल, सगळी जबाबदारी पंडीत नेहरू यांची तर मग तुमची काय राज्यघटना ही सुरक्षा आणि न्यायाचे कवच

मागील वर्षापासून देशाच्या स्वातंत्र्यापासून ते स्वातंत्र्यानंतर या देशातील जनतेच्या विकासासंदर्भात ज्या व्यक्तीने घेतलेली भूमिका आणि त्याने केलेली कामे जनतेला माहित आहेत. त्या व्यक्तीने देशाच्या भविष्यासाठी आयआयएम, आयआयटी, एम्स, गेल, भेल यासारख्या असंख्य संस्था उभ्या केल्या त्या व्यक्तीचे नाव पुसून टाकण्याचे काम आणि त्यांचे नाव कायमच्या विस्मरणात ढकलण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सत्तापक्षाला कायम भूतकाळात राहण्याची सवय आहे. १९३० काय झाले, ह्या वेळी काय झालं. पण ते वर्तमानात रहात नाहीत. परंतु सत्ता पक्षाने आता वर्तमानात काय, आज काय स्थिती आहे यावर बोलावे असा खोचक टोला भाजपाचे नाव न घेता लगावत सगळ्या गोष्टींसाठी जर पंडीत नेहरू जबाबदार असतील तर मग तुमची जबाबदारी काय असा खोचक सवाल काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी केला.

संसदेत आजपासून राज्यघटनेवरील चर्चेला सुरुवात झाली. त्या चर्चेत सहभागी झाल्यानंतर प्रियांका गांधी-वड्रा या बोलत होत्या. यावेळी प्रियंका गांधी-वड्रा यांनी भाजपाच्या धोरणांची शब्दशः पिसे काढली.

प्रियांका गांधी-वड्रा पुढे बोलताना म्हणाल्या की, हाथरस, उन्नाव येथील अत्याचार बाधित मुलीच्या कुटुंबियांची मी भेट घेतली. त्यावेळी तीच्या वडिलांना आणि कुटुंबियांनी मुलीवर झालेल्या सततच्या अत्याचारप्रकरणी फक्त न्याय हवा अशी मागणी केली. त्या मुलींवर वारंवार अत्याचार झाले, त्यावेळी त्यामुलीवर झालेल्या अत्याचारप्रकऱणी दाद मागण्यासाठी जात होती. तेव्हा ती ज्या जिल्ह्यातील होती तेथेही ही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यानंतर तिला दुसऱ्या जिल्ह्यात पाठविण्यात आले. मात्र तेथेही त्यांची दखल घेतली जात नव्हती. परंतु ते रोज सकाळी न्याय मागण्यासाठी रोज जात होते. ही ऊर्जा, ही सुरक्षेची भावना कोठून निर्माण झाली होती. ती म्हणजे केवळ भारतीय राज्यघटनेतून मिळत होती. त्यानंतर संभल येथील काही कुटुंबिय आम्हाला भेटायला आले होते. त्यावेळी दोन मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या पित्याचा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या पश्चात त्याच्या मुलाने वडीलांचे डॉक्टर बनविण्याचे स्वप्न साकार करण्याचा निर्धार व्यक्त केला. हे सगळं येतं कोठून तर फक्त राज्यघटनेने दिलेल्या सुरक्षा आणि न्याय देण्याच्या हमी मुळे असे सांगत आज जसा तुमचे कुटुंब आहे तसेच त्यांचेही आहे अशी आठवण यावेळी करून दिली.
भाजपावर शरसंधान करताना प्रियांका गांधी-वड्रा पुढे बोलताना म्हणाल्या की, काँग्रेसने केल्यात काही चुका त्याची माफीही मागितलीही आहे. मग तुम्हीही तुमच्या चुका कबूल करा, मागा माफी, ईव्हीएमशिवाय निवडणूका घेऊन दाखवा असे आव्हान देत पण तुमच्यात ते धाडस नाही. कारण तुम्ही सत्तेचा उपयोग सगळीकडे भीती निर्माण करण्यासाठी करत आहात. त्या भीती या संकल्पनेचाही एक गुणधर्म असतो. जो सातत्याने भीती निर्माण करतो, तो ही त्याच भीतीच्या सावटाखाली राहायला लागतो, तुम्ही तर तुमच्यावर झालेली टीकाही ऐकू शकत नाही, लोकांमध्ये जावू शकत नाही, ते केवळ भीतीच्या सावटाखालीच अशी खोचक टीकाही यावेळी केली.

पुढे बोलताना प्रियांका गांधी-वड्रा म्हणाल्या की, जेव्हा या देशात गांधी विचाराच्या नेृतत्वाखाली स्वातंत्र्याची लढाई सुरु होती. त्यावेळी देशात असलेले भित्रे-डरपोक लोक ब्रिटीशांना पाठिंबा देत त्यांच्या पाठीशी राहुन समझोते करत होते असा उपरोधिक टोला लगावत प्रियांका गांधी पुढे बोलताना म्हणाल्या की, हा देश फार काळ भित्र्यांच्या हाती राहिला नाही. त्यामुळे तो इथून पुढल्या काळातही राहणार नाही. देशाच्या सत्तापक्षाकडून फक्त एकाच व्यक्तीसाठी देश चालविला जात आहे. त्याचा आर्थिक फायदा वाढावा म्हणून हे सरकार काम करत असल्याचा आरोप केला.

प्रियांका गांधी-वड्रा पुढे बोलताना म्हणाल्या की, अध्यक्ष महोदय तुम्ही तुमच्या लहानपणी एक गोष्ट ऐकली असेल, एक राजा होता, तो करत असलेले काम योग्य आहे की चुकीचे आहे, लोक काय म्हणतात हे जाणून घेण्यासाठी रोज रात्री वेष पालटून जनतेत जात होता. परंतु आताही ‘एक राजा’ आहे त्यालाही वेष बदलण्याचा शौक आहे, पण जनतेत जात नाही, लोकांमध्ये मिसळत नाही की लोकं काय म्हणतात हे ऐकून घेत नाही इतका तो घाबरत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली.

शेवटी बोलताना प्रियांका गांधी वड्रा म्हणाल्या की, देश एक आहे आणि या देशात सर्वांना न्याय मिळेल, त्यांना आर्थिक एकसमान वाटा मिळेल अशी आशा, सुरक्षा फक्त राज्यघटना देत असून त्या सुरक्षेला आणि आशेला तडे देण्याचे काम सत्ता पक्षाकडून करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने सत्तापक्षाकडून सारखे सारखे संविधानाचे नाव घेतले जात आहे ते केवळ त्यांना निवडणूकीच्या निकालात मिळालेल्या जागांमुळे त्यांच्या तोंडून राज्यघटनेचा धोषा लावण्यात येत आहे. त्यामुळे या राज्यघटनेतील तत्वांमुळे यांना काहीही करता येत नसल्यानेच सत्तापक्षाला राज्यघटना बदलाची आहे. मात्र देशातील जनताच राज्यघटना राज्यघटना वाचविण्यासाठी पुढाकार घेत असल्यानेच तुम्हाला साधे बहुमतापर्यंत पोहचता आले नाही. तसेच तुमच्याकडे असलेल्या वॉशिंग मशिन मुळे इकडून गेलेले अनेक जण त्यांच्यात जाऊन स्वच्छ व क्लिन होऊन बाहेर निघत असल्याची खोचक टीकाही यावेळी केली.

About Editor

Check Also

इराणचे सर्वोच्च नेते अय्यातुल्लाह खामेनी यांच्या हत्येवर शांतता, देशाच्या परराष्ट्र धोरणावर शंका काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भारत-इराण संबध आणि मोदी सरकारवर टीकेची झोड

मोदी सरकारवर कडक टीका करताना, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी (३ मार्च …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *