मागील जून महिन्यापासून राज्यात मान्सूनचे आगमन झालेले असले तरी फारसा मान्सून सक्रिय झालेला नव्हता. मात्र आता जुलैच्या मध्यापासून मान्सून मुंबई पुणेसह राज्यातील इतर जिल्ह्यातही चांगलाच सक्रिय होताना दिसत आहे. यासंदर्भात पुढील चार दिवसांसाठी हवामान विभागाने इशारा दिला आहे.
आज १४ तारखेसाठी पालघर, ठाणे, मुंबईसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला होता. त्यानुसार आज पहाटेपासूनच या भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्याचा परिणाम मुंबई आणि उपनगरात सुरुवातीला नियोजित वेळेपेक्षा उशीराने लोकल सेवा सुरु होती.
तसेच हवामान विभागाने उद्या १५ जुलै ते, १७ आणि १८ जुलै रोजीही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करत पालघर, ठाणे आणि मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या कालावधीत महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडू नका असा इशाराही देण्यात आला आहे. ७ जुलै रोजी मुंबईत एकाच दिवसात २५३ पेक्षा जास्त पाऊस एकाच वेळी कोसळल्याने लोकलसेवा विस्तकळीत झाली होती. तसेच मुंबईकरांनाही मनस्ताप सहन करावा लागला होता. यापार्श्वभूमीवर या चालू आठवड्यातही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरण्यात येत आहे. दरम्यान आजही कोसळलेल्या पावसामुळे मुंबईतील वाहतूक सेवा विस्कळीत झाल्याचे आणि सखल भागात पाणी साचल्याचे चित्र पाह्यला मिळाले.
14 जुलै, IMD कडून महाराष्ट्रासाठी पुढील 5 दिवस जिल्हास्तरीय पावसाचा इशारा, 1/2 pic.twitter.com/RYNTDvUsGD
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 14, 2024
तसेच पुढील दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या भागातही अतिमुसळधार पाऊस कोसळ्याची शक्यता आहे. तसेच १६ ते १८ तारखेच्या कालावधीत अति मुसळधार पावसाची मात्र काही जिल्ह्याच्या विविध भागात कोसळणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. तसेच रायगडला १७ आणि १८ तारखेला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात या पूर्ण आठवड्यात साधारणतः पध्दतीने पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. या उलट मात्र धुळे, नंदूरबार, जळगांव या जिल्ह्यांना आज पासून १६ जुलैच्या कालावधीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर १७ आणि १८ जुलै रोजी ग्रीन अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
14 जुलै, IMD कडून महाराष्ट्रासाठी पुढील 5 दिवस जिल्हास्तरीय पावसाचा इशारा, 2/2 pic.twitter.com/oTM0PBDVjl
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 14, 2024
नाशिक, अहमदनगरला आजपासून तीन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर १७ आणि १८ तारखेला पाऊस साधारणत राहिल असा अंदाच व्यक्त करण्यात आला आहे. पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्याला १७ आणि १८ तारखेला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. मात्र आजही या दोन्ही जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत राहिला. सातारा जिल्ह्यालाही आज रेड अलर्ट देण्यात आला.
या शिवाय सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी या जिल्ह्यांना आज पासून तीन दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र सोलापूरात येलो अलर्ट देण्यात आलेला असतानाही संध्याकाळी ७ वाजल्यापासून धिम्या पध्दतीने पाऊस ठिपकत राहिला. त्याचबरोबर मराठवाड्यातील बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांसाठीही आज पासून पुढील तीन दिवस येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
तर अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर आदी जिल्ह्यातही एक दुसरा अपवाद वगळता संपूर्ण पाच दिवसांसाठी यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. तर गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातही पूर्ण आठवड्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील आठवडाभरामध्ये सखल पाणी साचल्याच्या आणि नद्यांनी धोका पातळी ओलांडल्याचे वृत्त अधिक असण्याची शक्यता अधिक आहे. मात्र या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळणार असून आतापर्यंत राज्यात निर्माण झालेला पावसाचा डेफिसिएट भरून निघण्यास मदत होऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे.
Marathi e-Batmya