उद्धव ठाकरे यांनी गल्लीत तरी शिवाजी महाराजांची मिरवणूक काढली होती का? भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा संजय राऊत यांना सवाल

कोल्हापूर येथील महायुतीच्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना केलेल्या मुंब्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधून दाखवा या आव्हानानंतर थयथयाट करणाऱ्या संजय राऊत यांनी त्यांचे मालक उद्धव ठाकरे यांनी कधी गल्लीत तरी छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढली होती का,याचे उत्तर द्यावे अशी मागणी भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी केली.भाजपा मीडिया सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी भाजपा केंद्रीय माध्यम समन्वयक के.के.उपाध्याय आणि प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते.

यावेळी बोलताना केशव उपाध्ये म्हणाले की, भाजपा कायमच छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखत आली आहे आणि तो कायमच राखणार. देवेंद्र फडणवीस यांनी शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धन आणि दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला. शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणली, गडकिल्ल्यांवरील गोंधळ घालण्याचे प्रकार रोखले, शिवस्मारकासाठी निधी दिला. सिंधुदुर्गातील घटना दुर्दैवी होती. पण त्यातील आरोपींना जेरबंद केले. कुणालाही पाठीशी घातले नाही. शिवसेना हे बाळासाहेब यांनी दिलेले नाव उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना नशिबानेच मिळाले.त्या नावाशिवाय छत्रपतींचे नाव घेण्याइतके उद्धव ठाकरे यांचे कर्तृत्व काय याचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावे, अशी मागणी करत मुंब्र्यात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधण्याची बाळासाहेबांसारखी हिंमत उद्धव ठाकरे दाखवतील काय, असा सवालही केला.

केशव उपाध्ये यांनी सांगितले की,राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात पाऊल टाकताच सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागावी.नागपूर आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वेगळेच नाते आहे. एकीकडे संविधान बचावच्या बाता करायच्या आणि दुसरीकडे परदेशात जाऊन राहुल गांधी यांनी आरक्षण रद्द करू,असे म्हणायचे. संविधानात ८० वेळा दुरुस्ती करून संविधानाची मोडतोड काँग्रेसनेच केली. तेलंगणात दलीतबंधू योजना रद्द का केली याचे उत्तर आधी राहुल गांधी यांनी द्यावे, मराठा आरक्षण न्यायालयात का टिकवता आले नाही, याचेही उत्तर त्यांनी द्यावेच असे आव्हानही यावेळी दिले.

पुढे बोलताना केशव उपाध्ये म्हणाले की, महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या लाडकी बहीण योजना रद्द करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनीच न्यायालयात धाव घेतली. गरीब महिलांना आर्थिक मदत मिळू नये यासाठी आटोकाट प्रयत्न केले, ही वस्तुस्थिती आहे. सतेज पाटील यांनी नुकताच छत्रपतींच्या गादीचा अवमान केला. या सगळ्याचेच प्रायश्चित्त म्हणून काँग्रेसने माफी मागावी. जर त्यांनी माफी मागितली नाही तर काँग्रेस ढोंगी आहे आणि त्यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये खूपच अंतर आहे, हे सिद्ध होईल, अशी टीकाही यावेळी केली.

शेवटी बोलताना केशव उपाध्ये म्हणाले की, पराभव दिसू लागला की भल्याभल्यांचा स्वतःवरचा ताबा सुटतो. नैराश्य येते आणि ते अनाकलनीय बडबड करू लागतात. महाविकास आघाडीलाही पराभव समोर दिसू लागल्याने त्यांचे ताळतंत्र सुटले असल्याची टीकाही यावेळी केली.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *