अमित शाह यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका, कोविडकाळात घरात बसणारे देशातील एकमेव मुख्यमंत्री चाळीसगाव येथील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा ठाकरेंवर थेट निशाणा

कोविड महामारीच्या काळात संपूर्ण देशातील राज्यांचे मुख्यमंत्री संकटाशी सामना करत होते, पण त्या संकटाला घाबरून घरात बसणारे उद्धव ठाकरे हे देशातील एकमेव मुख्यमंत्री होते, अशा शब्दांत प्रखर टीका करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चाळीसगावच्या सभेत उद्धव ठाकरे यांना थेट लक्ष्य केले. आपल्या सुखदुःखात आपल्यासोबत असतात, ते खरे लोकप्रतिनिधी असतात, पण राज्याचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नव्हते. असा नेता महाराष्ट्राला कसा वाचविणार, असा सवाल करून, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचे महायुती सरकारच महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास समर्थ आहे, अशी स्पष्ट ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. या सभेला व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खा. स्मिता वाघ, उमेदवार मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, येत्या २३ तारखेला आघाडीचा सुपडा साफ होणार आहे, आणि शिवरायांच्या महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन होणार आहे, असल्याचा दावा करत हरियाणाच्या निवडणूक निकालाने काँग्रेस आघाडीचा फुगा फुटला आहे, झारखंडमध्येही भाजपाचे सरकार येणार आणि महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन होणार आहे. काँग्रेस केवळ जनतेची दिशाभूल करून राजकारण करत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी बनविलेल्या संविधानाची शपथ संसदेत घेणारे राहुल गांधी महाराष्ट्रात संविधान म्हणून कोऱ्या पानांचे पुस्तक मिरवत होते, हे महाराष्ट्रातच उघड झाले. नकली संविधान दाखवून त्यांनी देशाच्या जनतेचा विश्वासघात केला आहे, बाबासाहेबांचा अपमान केला आहे. ज्या संविधानाचे दाखले ते देतात ते त्यांनी वाचले तरी आहे का, असा सवालही केला.

अमित शाह पुढे बोलताना म्हणाले की, महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रात गुंतवणूक घटली असा अपप्रचार ते करतात, पण ते त्यांच्याच काळातील वास्तव होते. शिंदे-फडणवीस-अजितदादांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यावर गेल्या दोन वर्षात विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राचा क्रमांक देशात पहिला आहे. त्याआधी देवेंद्र फडणवीस सरकारने केलेली विकासाची सारी कामे त्यांनी थांबविली, महायुती सरकारने ती कामे पुन्हा सुरू केली. तुमचे एक मत महाराष्ट्राच्या लाडकी बहिणीच्या खात्यात २१०० रुपये जमा करण्यासाठी, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १२ हजारावरून १५ हजारांपर्यंत पोहोचविण्यास मदत करणार आहे. महाराष्ट्रात एमएसपीवर २० टक्के भावांतर योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणारे ठरणार आहे, आणि विकसित भारतास अधिक मजबूत करणारे ठरणार असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, सोनिया-मनमोहन सरकारच्या दहा वर्षांत पाकिस्तानातून दहशतवादी येत होते, बॉम्बहल्ले करून निघून जात होते, पण वोटबँकेच्या राजकारणापायी त्यांनी काहीच केले नाही. २०१४ मध्ये मोदी सरकारला जनतेने निवडून दिले, मोदीजींनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. गेल्या दहा वर्षांत मोदींनी नक्षलवाद निपटून काढला आहे. येत्या काही वर्षांत या देशातून नक्षलवाद संपलेला असेल, अशी ग्वाही देत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सर्वात अगोदर भारताचे यान उतरले, तेथे मोदीजींनी शिवशक्तीचे नाव देऊन शिव आणि शक्तीला चंद्रावर प्रस्थापित केले आहे. मोदींनी भारताला सुरक्षित केलेच, पण समृद्धही केले आहे. मनमोहन सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर होती, मोदींनी ती पाचव्या क्रमांकावर आणली, येत्या तीन वर्षांत भारत ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल, असे विश्वासही यावेळी व्यक्त केला.

अमित शाह पुढे बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने उत्तर महाराष्ट्रातील विकासाची रोखलेली सर्व कामे महायुती सरकारने केली आहेत. पुन्हा जर चुकून जरी महाविकास आघाडी सत्तेवर आलीच, तर महाराष्ट्र हे दिल्ली काँग्रेसचे एटीएम म्हणून कामाला लागेल, व महाराष्ट्राचा पैसा दिल्लीच्या खजिन्यात जमा होईल अशी खोचक टीका करत याऊलट, महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले, तर शिवरायांच्या महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी दिल्लीचा खजिना खुला करण्याचे काम मोदीजी करतील, अशी ग्वाहीदेखील दिली.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना अमित शाह म्हणाले की, मोदींनी महाराष्ट्राला काय दिले, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला होता, पण काँग्रेस- शरद पवारांनी दहा वर्षे केंद्रात सत्ता उपभोगूनही, महाराष्ट्राला काय दिले, याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. आज मीच त्याचा हिशेब देतो, असे सांगून शाह यांनी आकडेवारीच सादर केली. २००४ ते १४ मध्ये काँग्रेसने एक लाख ९१ हजार कोटी रुपये महाराष्ट्रात पाठविले, तर मोदी सरकारने १० लाख १५ हजार ८९० कोटी रुपये दिले. ७८ हजार कोटींच्या वाढवण बंदराचा प्रारंभ मोदी सरकारने केला आहे. याऊलट, कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल या राज्यांत काँग्रेसने दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. मोदी की गँरंटी ही काळ्या दगडावरची रेघ असते. महायुतीचे सरकार आले की लाडकी बहीण योजनेत १५०० ऐवजी २१०० रुपये दिले जातील, शेतकऱ्यांची कर्जे माफ केली जातील, किसान सन्मान निधीची रक्कम १२ हजारांवरून १५ हजारांपर्यंत वाढविली जाईल, वृद्धावस्थाचे निवृत्तीवेतन १५०० वरून २१०० वर वाढविले जाईल, ४५ हजार गावांत रस्ते बांधले जातील, युवकांना प्रशिक्षण भत्ता, आशा वर्करना वेतनवाढ, अशा अनेक योजनांचा उल्लेख करून भाजपाच्या संकल्पपत्राचा पुनरुच्चार केला.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *