अंबादास दानवे यांची स्पष्टोक्ती, राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, हिंदी भाषेची सक्ती सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर, महाविकास आघाडी सरकारचा बहिष्कार

राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, शेतकऱ्यांप्रती सरकारची असंवेदनशीलता, बळीराजाची होत असलेली दयनीय अवस्था, विविध भ्रष्टाचारात मंत्र्यांचा हात, हिंदीची होत असलेली सक्ती यामुळे सरकारने पावसाळी अधिवेशनापूर्वी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अजिंक्यतारा या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारच्या कार्यकाळात झालेले घोटाळे, अत्याचाराच्या घटना, राज्यातील जनतेची व शेतकऱ्यांची सरकारकडून होत असलेली फसवणूक यावर ताशेरे ओढले.

या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे, प्रतोद व आमदार सुनील प्रभू, आमदार सचिन अहिर, काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ उपनेते अमीन पटेल, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे उपस्थित होते.

अंबादास दानवे पुढे म्हणाले की, सत्ताधारी पक्षाचे लोकं वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी आहेत, पोलिसांचं त्यांना संरक्षण आहे, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री त्यांना प्रोत्साहन देतायतं, नेमकं भाजपा आणि गद्दारांनी आपला महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला आहे अशी टीकाही यावेळी केली.
आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापान कार्यक्रमाला जायचं म्हणजे पापच ! भ्रष्टाचाराचे डाग घेऊन जे लोकं चहापान कार्यक्रमाला जातील, त्याच लोकांकडे बघून मुख्यमंत्री म्हणतील, ह्याच लोकांवर मी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री यांना त्यांच्याच विधानावरून चिमटा काढला.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्या महामार्गाला माझ्या आजोबांचं नाव दिलं गेलं; त्यावरच खड्डे पडले आहेत, नदी वाहत आहे, हे नेमकं काय चाललंय? असा सवाल समृद्धी महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांवरून उपस्थित केला.

यावेळी बोलताना काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, भ्रष्टाचारात अखंड बुडालेले हे सरकार आहे. कामे पैसे दिल्याशिवाय होत नाही. निधी हवे तरी टक्केवारी मोजावी लागते, असा आरोप केला.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, कांदा, कापूस व सोयाबीन पिकाला भाव नाही. कापसाला कीड लागलेली नसताना मदत दिली जात नाही. सरकारने सत्तेवर आल्यावर जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याचे यावेळी सांगितले.

तर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, महायुती सरकार राजकीयदृष्ट्या उध्वस्त झालं आहे. या सरकारचा सुरू असलेला राजकिय जुगार हा केविलवाणा व किळसवाणा आहे, अशी टीका केली.

यावेळी बोलताना सतेज बंटी पाटील यांनी मागणी करत म्हणाले की, शक्तिपीठ महामार्गाला १२ जिल्ह्यातील शेतकरी विरोध करत आहे, त्याला राजकीय रंग का दिला जातोय असा सवाल काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होणार असून गरज नसलेला हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, अशी मागणी केली.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *