भाजपा महायुती सरकार व मुंबई महानगरपालिकेचा मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा पुरवणे हे सरकार आणि महानगरपालिकेची नैतिक जबाबदारी असताना, मुंबईत अनेक महापालिका रुग्णालये सुविधांअभावी अक्षरशः व्हेंटिलेटरवर आहेत. गरीब कुटुंबांतील रुग्णांचे हाल होत आहेत. महानगरपालिकेचा तब्बल ७ हजार कोटींचा आरोग्य विभागाचा निधी नक्की जातो कुठे? असा संतप्त सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी विचारला.
खासदार वर्षा गायकवाड यांनी विलेपार्ले येथील आर. एन. कूपर रुग्णालयाला भेट दिली. यावेळी माजी आमदार अशोक जाधव, मोहसिन हैदर, अशरफ आझमी, अवनीश सिंग, श्रीमती हैदर, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, कचरू यादव, जयकांत शुक्ला, नीता महाडिक इत्यादी उपस्थित होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, कूपर रुग्णालयाची अवस्था गेल्या अनेक महिन्यांपासून दयनीय आहे. या रुग्णालयाला भेट दिली असता हे स्पष्ट दिसून आले की, इथे ना रुग्णांसाठी योग्य सुविधा आहेत, ना औषधं, ना पुरेसे कर्मचारी आणि ना मूलभूत सुविधा व्यवस्थित आहेत.
वर्षा गायकवाड पुढे म्हणाले की, रुग्णालयामध्ये अस्वच्छतेमुळे उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. धक्कादायक, म्हणजे मागील दोन महिन्यांमध्ये इथे सहा रुग्णांना उंदरांनी चावा घेतला आहे, पण सरकार व बीएमसी कुंभकर्णी झोपेत आहे. या सरकारमध्ये थोडीशी नीतिमत्ता जरी शिल्लक असेल तर त्यांनी सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणे तात्काळ थांबवावे आणि रुग्णांसाठी आवश्यक सर्व सुविधा त्वरित सुरू कराव्यात अशी मागणीही केली.
वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, यापूर्वी मी कुर्ला, वांद्रे, गोवंडी आणि घाटकोपर येथील उपनगरीय रुग्णालयांना भेट दिली होती. तिथे सुद्धा हीच परिस्थिती पहायला मिळाली. सुविधा कमीच आहेत आणि डॉक्टरांची संख्याही अपुरी आहे. वारंवार निवेदने दिल्यानंतरही महापालिका आणि सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. हे सगळे जाणीवपूर्वक केले जात आहे. महापालिकेच्या रुग्णालयांची दुरावस्था करून त्यांच्या खासगीकरणाचा डाव सरकार खेळत आहे. मात्र आम्ही तसे कदापि होऊ देणार नाही. सार्वजनिक आरोग्य ही सरकार आणि महापालिकेची जबाबदारी आहे. सार्वजनिक आरोग्य सेवेच्या खासगीकरणाला आमचा विरोध कायम राहील असा इशाराही दिला.
Marathi e-Batmya