पक्षातील कुणी वेगळा निर्णय घेत असेल तर शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेसमधील गयारामांना शरद पवारांकडून मोकळीक

साताराः प्रतिनिधी
पक्षातील कुणी मंडळी जर काही वेगळा निर्णय घेत असतील, तर आमच्या त्यांना शुभेच्छा! असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गयाराम आणि गयारामाच्या तयारीत असलेल्यांना लगावत राजकारणात कधी कधी असा प्रसंग येतो, त्याचा सामना करायचा मला अनुभव आहे. एक गोष्ट चांगली आहे, सरकार येणार नाही म्हणून ते चालले आहेत हे त्यांनी जाहीर केले ते बरे झाले असे आश्वासक उद्गारही त्यांनी काढले.
सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला. त्यानंतर सातारा दौऱ्यावर शरद पवार आले होते. त्यावेळी आय़ोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राष्ट्रवादीच्या आमदारांनी पक्ष सोडताना कामं होत नसल्याची कारणं दिली आहेत. ते एक बरंच झालं. सत्ताधारी सूडबुद्धीनं वागताहेत आणि विरोधक त्यांना तोंड देऊ शकत नाहीत असा निष्कर्ष यातून निघतो असेही ते म्हणाले.
साताऱ्यातून आणखी किती लोक पक्ष सोडून जाणार आहेत याची मला कल्पना नाही. मात्र, यशवंतराव चव्हाणांचा विचार ज्यांनी स्वीकारलाय ते असं काही करणार नाहीत. त्यांना विरोधात असल्याचा त्रास होईल. मात्र, त्यांची नाळ मतदारांशी असल्यानं चिंता करण्याची गरज नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये गेल्याचा कोणताही परिणाम साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसवर होणार नाही. साताऱ्याच्या उमेदवारीसाठी माझ्याकडे तीन अर्ज आले आहेत. मला उमेदवारांची चिंता नाही. ही जागा राष्ट्रवादी निश्चित राखेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजपमध्ये जाणार नाही असं शिवेंद्रराजेंनीच मला सांगितलं होतं. साताऱ्याच्या खासदारांसोबत बैठक व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. संसदेच्या अधिवेशनानंतर चर्चा करू असं आमचं ठरलं होतं. मात्र, त्याआधीच त्यांनी वेगळा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी १ मे पासून मराठी भाषा आवश्यक अन्यथा लायसन्स इश्यू करणाऱ्या अधिकाऱ्यावर आणि चालकावर कारवाई करणार

येत्या १ मे, महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे आवश्यक करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *