वर्षा गायकवाड यांचा विश्वास, काँग्रेस पक्ष नेहमीच उत्तर भारतीयांच्या पाठीशी सक्षमपणे उभा मुंबई काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलचा जाहीरनामा प्रसिद्ध

मुंबई महानगरपलिका निवडणुकीच्या तयारीसाठी राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. मुंबई काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलने सात कलमी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये उत्तर भारतीयांच्या सन्मानाचे आणि स्वयंरोजगाराचे रक्षण करण्यासह अनेक प्रमुख आश्वासने देण्यात आली आहेत.

शारदा ज्ञानपीठ इंटरनॅशनल स्कूल, दत्त मंदिर रोड, मालाड (पूर्व) येथे आयोजित जाहीरनामा प्रकाशन कार्यक्रमात काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश प्रभारी अविनाश पांडे यांनी, केंद्र सरकारवर हल्लाबोल करत देशाच्या सीमा सुरक्षित नसल्याचे सांगितले. भाजपा सरकारच्या काळात दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. देशाच्या विकासात सर्वांचे योगदान आहे, परंतु भाजप सरकार सत्तेत आल्यापासून देशातील सामाजिक सलोखा बिघडवत आहे.

उत्तर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अजय राय म्हणाले की, उत्तर भारतीयांनी एकत्र येऊन भाजप युती सरकारला पराभूत करण्यासाठी काम करावे. मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाच्या सरकार मध्ये उत्तर भारतीय समुदायाला नेहमीच प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. काँग्रेसने पक्षाने उत्तर भारतीयांना आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक महापौर पदांची संधी दिली. परंतु भाजप सरकारने अशा कोणत्याही संधी दिल्या नाहीत. भाजप उत्तर भारतीयांची मते घेते पण त्यांच्या समस्या कधीच सोडवत नाही.

माजी मंत्री अस्लम शेख म्हणाले की, काँग्रेस पक्षाने नेहमीच उत्तर भारतीय समुदायाचा आदर केला आहे. उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष अ‍ॅड. अवनीश तीर्थराज सिंह म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा पहिला राजकीय पक्ष आहे ज्याने उत्तर भारतीयांच्या प्रमुख मुद्द्यांना त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात समाविष्ट केले आहे. उत्तर भारतीय सेलने सुरू केलेल्या ‘उत्तर भारतीयांशी संवाद – मुद्द्यांवर चर्चा’ या मोहिमेत उत्तर भारतीय समुदायाने उत्साहाने भाग घेतला. या मोहिमेत, उत्तर भारतीय समाजातील लोकांनी केवळ त्यांच्या समस्या मांडल्या नाहीत तर काँग्रेसशी अतूट संबंध प्रस्थापित करण्यासाठीही पुढाकार घेतला आहे.

काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलचा जाहीरनामा…

उत्तर भारतीय सेलच्या जाहीरनाम्यात फेरीवाला धोरण आणि स्मार्ट व्हेंडिंगवर भर देण्यात आला आहे. टाउन व्हेंडिंग कमिटीच्या निवडणुका पारदर्शक असतील आणि प्रत्येक पात्र विक्रेत्याला कार्ड डिजिटल परवाना देण्यात येईल. उत्तर भारतीयांना राजकीय आणि सामाजिक संरक्षण दिले जाईल. ऑटो-टॅक्सी चालकांसाठी विश्रांती केंद्रे निर्माण करण्यासाठी सीएनजी स्टेशनचा विस्तार केला जाईल. चालकांसाठी मोफत आरोग्य तपासणीसाठी वर्कशॉप कॉर्नर देखील उभारले जातील. दिवाळी आणि छठपूजेसाठी, बीएमसी रेल्वेसोबत काम करून स्थानकाबाहेर मोठे प्रतीक्षालय तयार करेल. यामध्ये १० ते ५० रुपयांत झोपण्याची व जेवणाची व्यवस्था केली जाईल. छठ पूजेसाठी समुद्रकिनाऱ्यांवर कायम स्वरूपी विसर्जन तलाव आणि घाट बांधले जातील. महिलांसाठी सुरक्षित कपडे बदलण्याची खोली, प्रकाश व्यवस्था आणि जीवरक्षकांची कायमस्वरूपी व्यवस्था केली जाईल. उत्तर भारतीयांसाठी एक भव्य प्रवासी भवन बांधले जाईल जे सांस्कृतिक कार्यक्रम आणि लग्नांसाठी स्वस्त दरात उपलब्ध असेल. मुंबईतील तबेल्यांसाठी परवाना प्रक्रिया पारदर्शक करण्यासोबतच, पाणी बिल व्यावसायिक ऐवजी अनुदानित श्रेणीत आणले जाईल.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *