भाजपा महायुती सरकारचा वाढवण बंदराचा हट्ट भूमिपुत्रांच्या अस्तित्वाचा बळी देऊन उद्योगपतींचे हित साधणारा असून तो काँग्रेसला मान्य नाही. या प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे पण हा विरोध पोलीस दडपशाही करून मोडून काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकारने ही पोलीस दडपशाही थांबवून आंदोलकांशी तातडीने चर्चा करावी आणि स्थानिकांच्या मुळावर उठलेल्या वाढवण बंदराची सर्व कामे तातडीने थांबवून प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
जालना येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, पालघरमध्ये वाढवण बंदराविरोधात १०० हून अधिक दिवसांपासून भूमिपुत्र, आदिवासी, मच्छीमार, शेतकरी, महिला आणि युवक आपल्या हक्कांसाठी संघर्ष करत आहेत. मात्र, त्यांच्या मागण्यांवर संवाद साधण्याऐवजी सरकार पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. महिला, लहान मुले आणि ग्रामस्थांशी गैरवर्तनाच्या तक्रारी गंभीर असून पोलीस दडपशाही तातडीने थांबवून या घटनांची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. वाढवण बंदरामुळे पालघरच्या किनारपट्टीचे पर्यावरण, सागरी जैवविविधता, पारंपरिक मासेमारी आणि हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर संकट निर्माण होण्याची भीती आहे. भूमिपुत्रांचे अस्तित्व आणि निसर्ग उद्ध्वस्त करून साधला जाणारा विकास कदापी स्वीकारार्ह नाही. काँग्रेस पक्ष भूमिपुत्र, मच्छीमार, आदिवासी आणि शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून त्यांना न्याय मिळेपर्यंत लोकशाही व संविधानिक मार्गाने हा संघर्ष सुरू ठेवेल असेही म्हणाले.
Marathi e-Batmya