कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती, राज्यात अतिवृष्टीमुळे ८ लाख हेक्टर पीकांचे नुकसान सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, तातडीने मदत करणार

राज्यात ९ ऑगस्टपासून आजपर्यंत १९ जिल्ह्यातील १८७ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या काळात ८ लाखांपेक्षा जास्त हेक्टर पीकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून, जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून पीडित शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करावे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी आणि महसूल विभागाला दिले आहेत. शेतकरी बांधवांनी धीर सोडू नये. शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाहीही भरणे यांनी दिली आहे.

राज्यात मागील आठवड्याभरापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे अनेक भागात परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे जवळपास २१ लोकांचा मृत्यू झाला आहे. सोबतच मोठी पशूधनाची हानी झाली असून, घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे भरपाई देण्याबाबत कार्यवाहीचे निर्देश मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारीच दिले आहेत. दुसरीकडे, राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री भरणे नुकसानग्रस्त भागाचा सध्या दौरा करत आहेत. धाराशिव, नांदेड, वाशिम भागात जाऊन भरणे यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. सर्वाधिक अतिवृष्टी झालेल्या नांदेड व वाशिम जिल्ह्याच्या पाहणी दौ-यावर असून शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या त्यानी व्यथा जाणून घेतल्या.

यासंदर्भात माहिती देताना दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्यातील नुकसानग्रस्त पीकांची तपशीलवार नोंद घेतली जात आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व मदत त्वरित देण्याच्या सूचना दिल्या आहेत. अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे, घरांचे व सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देत एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. नांदेड, यवतमाळ, अकोला, सोलापूर व हिंगोली जिल्ह्यांत सर्वाधिक जास्त नुकसान झाले आहे. १० हजार हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झालेल्यांमध्ये ११ जिल्ह्यांचा समावेश आहे. सर्वाधिक बाधित पिकांमध्ये सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग आदींचा समावेश आहे. सोबतच, भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद आदी पीकांनाही फटका बसला आहे.

शेवटी बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, प्रत्येक गावात झालेल्या नुकसानीचा अहवाल लवकरात लवकर शासनाकडे पोहोचवला जाईल व तातडीने मदत दिली जाईल. शेतकरी हा आपल्या समाजाचा कणा आहे. संकटात शासन त्याला एकटे सोडणार नाही. जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याचे प्रश्न मी प्रत्यक्ष पाहिले आहेत. प्रशासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तत्परतेने काम करावे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असले तरी शासनाची ठाम भूमिका आहे. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचवली जाईल, अशी माहिती कृषीमंत्री भरणे यांनी दिली.

कोणत्या जिल्ह्यांत किती झाले नुकसान

जिल्हा नुकसानग्रस्त व बाधित क्षेत्र

नांदेड       २ लाख ८६ हजार हेक्टर
वाशिम      १ लाख ६५ हजार हेक्टर
यवतमाळ   ८१ हजार हेक्टर
बुलढाणा     ७५ हजार हेक्टर
अकोला      ४४ हजार हेक्टर
सोलापुर      ४२ हजार हेक्टर
हिंगोली       ४० हजार हेक्टर
धाराशिव     २९ हजार हेक्टर
परभणी       २० हजार हेक्टर
अमरावती    १३ हजार हेक्टर
जळगाव       १२ हजार हेक्टर

About Editor

Check Also

महिला शेतकऱ्यांसाठी २३ जानेवारी रोजी मुंबईत चर्चासत्राचे आयोजन कृषी विभाग आणि एमएस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम

महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने आणि एमएस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (एमएसएसआरएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने महिला शेतक-यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *