नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावा याचिका अस्पष्ट आणि सदोष असल्याचा नाराय़ण राणेंचा अर्जातून दावा; लवकरच सुनावणीची शक्यता

शिवसेना उबाठा नेते विनायक राऊत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजपा नेते नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान दिले आहे. परंतु, ती याचिका फेटाळून लावण्यात यावी, अशी मागणी कऱणारा अर्ज नारायण राणे यांच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला आहे. त्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

आपल्याविरोधात केलेली निवडणूक याचिका सदोष असून त्यात मूलभूत पुरावे आणि तथ्यांचा अभाव आहे. त्यामुळे ती ऐकण्यायोग्य नाही. कोणत्याही निवडणुकीच्या निकालाला आव्हान देण्यासाठी कायदेशीर तरतुदींचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य असल्याचा दावा राणे यांनी अँड. सतीश मानशिंदे यांच्यामार्फत केलेल्या याचिकेतून केला आहे. राऊत यांनी दाखल केलेल्या याचिकेत वेळ, ठिकाण आणि कथित घटनांमध्ये सामील अधिकारी, कार्यकर्ते यांसारख्या महत्वाच्या तपशीलांचा अभाव आहे. शिवाय, याचिकेत केलेले आरोप अस्पष्ट आहेत आणि कथितपणे पैसे वाटप करणाऱ्यांची नावे किंवा कोणताही तपशील दिलेला नसल्याकडेही याचिकेतून प्रश्नचिन्ह उपस्थित कऱण्यात आले आहे. याचिकेत पुरावे म्हमून जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात याचिकाकर्ते अयशस्वी ठरल्याचा दावाही याचिकेत केला आहे.

काय आहे राऊत यांची याचिकेत मागणी

लोकसभेची रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी ७ मे रोजी पार पडलेल्या निवडणूकीत भाजपाकडून ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी तत्कालीन खासदार (उबाठा) विनायक राऊत यांचा ४७,८५८ मतांनी पराभव केला. मात्र, निवडणूकीदरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये राणे समर्थक मतदारांना पैसे वाटून राणेंनाच मतदान करण्यास सांगत आहेत. या व्हिडीओची स्वतंत्र समिती स्थापन करून चौकशी करावी आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून राणे यांची खासदारकी रद्द करावी, अशी मागणी राऊत यांनी याचिकेतून केली आहे. त्यासोबतच याचिकेवरील अंतिम सुनावणीपर्यंत राणे यांना खासदार म्हणून काम करण्यापासून प्रतिबंध करावे, असे आदेश देण्याची मागणीही राऊत यांनी केली आहे. लोकप्रतिनिधी कायदा १९५१ नुसार, मतदानाच्या ४८ तास आधी प्रचाराला पूर्णविराम दिला जातो. तथापि, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात ६ मे रोजीही राणे यांचे कार्यकर्ते-समर्थक प्रचार करीत असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. तसेच, ही कृती वैधानिक तरतुदीचे उल्लंघन करणारी आहे. दुसरीकडे, राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनीही १३ एप्रिल रोजी जाहीर सभेत मतदारांना धमकावल्याचा आरोपही राऊत यांनी याचिकेत केला आहे. या प्रकरणी १६ मे रोजी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करून राणे यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना धमकावणे आणि लाच देण्यासारख्या भ्रष्ट पद्धतीचा अवलंब करून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे सांगितले होते. मात्र, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, न्यायालयात धाव घेतल्याचे राऊत यांनी याचिकेत म्हटले आहे.

About Editor

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नाथ म्हणाले, ७० टक्के कैद्यांवर अद्याप गुन्हे सिद्ध नाही देवी स्क्वेअर सर्कल क्लिनिकच्या अहवालात माहिती

३६ वर्षीय वनिता देवी (नाव बदलले आहे) हिच्यावर २०१७ मध्ये तिच्या तीन आणि सहा वर्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *